जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. त्यातच आज सोमवारी तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत करोनाबधितांच्या मृत्यूचा आकडा सहा झाला आहे.
सोमवारी मृत्यु झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एक महिला आहे. यात पुसद येथील ६० वर्षीय आणि दारव्हा येथील ४५ वर्षीय पुरुष तर दारव्हा येथील ६६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या तिघांनाही ‘सारी’ची लक्षणेसुध्दा होती. आतापर्यंत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दारव्हा येथील तिघे तर पुसद, उमरखेड व महागाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले दोन जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. येथे सद्यस्थितीत ३२ सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण ३९ जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८४ वर गेली असून यापैकी १४६ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
रेड झोनमधून आलेल्या नागरिकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच स्थानिक लोकांनीसुध्दा आपल्या गावात आलेल्या लोकांबद्दल तात्काळ तालुकास्तरीय समितीला कळवावे. नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 8:29 pm