करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव जिल्ह्यास पुन्हा पूर्ण टाळेबंदीकडे घेऊन चालला आहे. याचाच पहिला भाग म्हणून प्रशासनाने उद्या बुधवार १४ जुलैपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह सर्व प्रतिष्ठाने व दुकांनांच्या वेळेत बदल केले आहेत. सध्या सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी राहणारी दुकाने आता सकाळी १० ते दुपारी २ या काळात उघडी ठेवण्याचे आदेश प्रशासनाने आज दिले. त्यानुसार पुढील आठ दिवसांत करोनावर नियंत्रण न मिळाल्यास जिल्ह्यात आणखी काही दिवस पूर्ण टाळेबंदी घोषित करण्याचे सुतोवाच पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात नागरिक ठिकठिकाणी गर्दी करीत असल्याने वेळा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सोमवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आज यासंदर्भात आदेश काढले. वेळेत बदल केले असले तरी शेतकऱ्यांना शेतीची संपूर्ण कामे करण्यास सुट देण्यात आली आहे. कृषी साहित्याची दुकाने, रासायनिक खतविक्री, बी-बियाणे विक्री व वाहतूक त्यांची गोदामे, दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

शिवाय सर्व शासकीय व खासगी दवाखाने, औषधी दुकाने, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी वैद्यकीय अत्यावश्यक सेवा तसेच पशुवैद्यकीय दवाखाने व औषधालये २४ तास सुरू राहतील. हॉटेल, रेस्तराँमधून दुपारी २ वाजेपर्यंत पार्सल सुविधा देण्यास मोकळीक देण्यात आली आहे. बँकाच्या वेळाही दुपारी २ पर्यंतच ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात प्रवेशासाठी केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक कारणासाठीच ई-पासद्वारेच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. कोणीही जिल्ह्याबाहेर प्रवास करून आल्यास त्यांना गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. लग्न समारंभसुद्धा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच आटोपण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशांचे पालन न करणाऱ्यांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमासह कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, यवतमाळ शहरासोबतच ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गेले दोन दिवस तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेऊन उपायोजनेसंदर्भात माहिती सूचना केल्या.

२५ रूग्ण स्वगृही, नव्याने १४ बाधित

जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आज मंगळवारी २५ रूग्णांनी करोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले. तर दुसरीकडे जिल्ह्यात आज नव्याने १४ व्यक्तींचा अहवाल सकारात्मक आला. यापैकी आठ जणांचे नमुने प्रयोगशाळेत तर सहा जण ‘रॅपिड ॲन्टीजन टेस्ट’द्वारे सकारात्मक आले आहेत. आज सकारात्मक आलेल्या १४ रूग्णांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १३९ आहे. तर एकूण रूग्णसंख्या ४७६ वर पोहोचली आहे. यांपैकी ३२४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.