राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याने आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागतो की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्शअवभूमीवर आज राज्यातील करोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ऑनलाईन संबोधित केलं. यावेळी त्यांनी जनतेसह विरोधकांना देखील करोना विरुद्ध लढण्यासाठी एकजुट दाखवण्याचे आवाहन केले. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, “होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची”

तसेच, “युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन करोना थांबविण्यात अधिक मदत करेल.” असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे.

राज्यात लवकरच दररोज अडीच लाख चाचण्या केल्या जाणार – मुख्यमंत्री

“आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत. पण, ७.४ बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत.पण, ३.४ बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय. बेल्जियमने परत लॉकडाउन केलाय. पण, २० बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय. पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…पण, १३ बिलियन युरोचे पॅकेज मार्च २०२० मध्येच जाहीर केले. डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…पण, एप्रिल २०२० मध्येच सर्वच घटकांना पॅकेज ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत पण, २,२०,००० उद्योग आणि ६ लाखांवर कर्मचार्‍यांना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना ८०० युरोंपर्यंत मदत! फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला…पण, १२० अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले. हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’ पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला.” अशा प्रकारे सविस्तर माहिती देत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतल्याचे दिसून आले.

तर, “काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील” असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यात लवकरच दररोज अडीच लाख चाचण्या केल्या जाणार – मुख्यमंत्री

“भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे, आता अजून कुणाशी चर्चा करणार आहात , घ्या की निर्णय ….नेहमीप्रमाणेच या बाबतीतही निर्णय दिरंगाई. इतक्या महिन्यांत जे नाही झाले ते पुढच्या दोन दिवसांत काय मोठा चमत्कार घडणार आहे. अहो सत्य परिस्थिती, वास्तव काय समोर मांडताय…त्याची सर्वाधिक झळ तर आम्हाला बसतेय. या वास्तवाला जबाबदार कोण ? …चिंताजनक दिशेने तुम्हीच तर ढकलले.करोनाचे अवतार सांगताय पण सरकारचा खरा अवतार जनतेला दिसला.” असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.