भारतात हिवाळ्यात स्थलांतरित होणाऱ्या आणि युरोप व आशियात मोठय़ा संख्येने आढळून येणाऱ्या ‘येलो ब्रेस्टेड बंटिंग’ या पक्ष्यांची संख्या शिकारीमुळे सुमारे ९० टक्क्यांनी कमी झाली आहे. १९८० पासून सुमारे पाच हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात बर्डलाईफ इंटरनॅशनल आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ने केलेल्या अभ्यासात यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या संदर्भातला शोधप्रबंध जीवशास्त्र संशोधन या नियतकालिकात नुकताच प्रकाशित करण्यात आला. चीनमध्ये मोठय़ा संख्येने होणारी या पक्ष्याची शिकार हे त्याच्या कमी होण्यामागील एक कारण असल्याचे यात सांगण्यात आले आहे. युरोप आणि आशियात प्रामुख्याने फिनलँड ते जपानपर्यंत त्याचा मोठय़ा प्रमाणात वावर होता. भारतात प्रामुख्याने सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मणिपूर, तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात तो स्थलांतर करून येत होता. नेपाळ आणि बांगलादेशातही हिवाळ्यात तो स्थलांतरणादरम्यान दिसून येत होता. ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत सुमारे २०० च्या संख्येत त्यांचा थवा आढळतो. मात्र, ज्या चीनमध्ये त्याचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात आहे तेथेच त्याची मोठय़ा प्रमाणावर शिकार केली जाते. स्थलांतरणादरम्यान रात्रीच्या वेळी ते मुक्काम करतात आणि अशा वेळी त्यांना सहज जाळ्यात अडकवणे सोपे जाते. पारंपरिक पद्धतीने त्यांना जाळ्यात अन्न अडकवून आकर्षित केले जाते.
ही शिकार आता उच्चस्तरावर पोहोचली आहे. चीनमध्ये सहजपणे हा पक्षी बाजारात विकला आणि खाल्ल्याही जात होता, पण तो संख्येने कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर १९९७ मध्ये खाण्यावर आणि त्यानंतर २०१३ पासून त्याच्या विक्रीवरही बंदी आणली गेली. तरीही अवैधरित्या तेथे मोठय़ा प्रमाणात त्याची विक्री होते. २००१ चा अंदाजानुसार चीनच्या एकटय़ा गांगडाँग परिसरातून सुमारे १० लाख ‘येलो ब्रेस्टेड बंटिंग’ हे पक्षी खाण्यात आले. त्या तुलनेत भारतात मात्र त्याच्या शिकारीचे आणि खाण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडे, बिहारात व झारखंडच्या काही भागात या पक्ष्यासह ‘रेड हेडेड बंटिंग’ची शिकार होते.
निसर्ग संरक्षण आणि कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी केली तरच त्याची शिकार थांबवली जाऊ शकते. भारतातही मोठय़ा संख्येने पक्ष्यांची शिकार केली जाते, पण वनखाते आणि अवैध शिकार प्रतिबंधक पथक केवळ वाघांच्याच शिकारीवर लक्ष्य केंद्रित करून आहे. वनखाते, पोलीस, स्थानिक संस्था, स्वयंसेवींनी एकत्र येऊन वन्यजीव प्रजातीची शिकार रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपादन बीएनएचएसचे संचालक डॉ. असद रहमानी यांनी केले. बर्डलाईफ इंटरनॅशनलचे वरिष्ठ संवर्धन अधिकारी सिंबा चान यांच्या मते उर्वरित पक्ष्यांच्या संवर्धनाकरिता आणि वन्यजीवांचा खाण्यातील वापर थांबवण्याकरिता लोकांना शिक्षित करण्याची गरज आहे. चीन, जपान, कोरिया आणि रशिया या देशांनी स्थलांतरित पक्ष्यांच्या सुरक्षिततेकरिता एकत्रितपणे लक्ष्य ठेवण्यासाठी करार करून त्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे. २०१७ पर्यंत येलो ब्रेस्टेड बंटिंगच्या सुरक्षेकरिता आंतरराष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.