जवखेडे खालसा (पाथर्डी) येथील दलित कुटुंबातील तिघांच्या हत्याकांडाच्या तपासाला अजूनही गती मिळालेली नाही. पोलिसांनी आता सहा संशयितांच्या नाकरे चाचणीची परवानगी न्यायालयाकडे मागितल्याचे समजते. त्यामुळे तपासातील अपयशच ठळकपणे अधोरेखित होत आहे. दरम्यान नाकरे चाचणीच्या परवानगीबाबतही पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली असून, त्याला दुजोरा दिलेला नाही.
या हत्याकांडाला आता तब्बल अठरा दिवस झाले आहेत. पोलिसांना आरोपींबाबत कोणतेच धागेदोरे अद्याप मिळालेले नाहीत. पोलिस मारेकऱ्यांच्या जवळपासही पोचलेले नाहीत. जिल्ह्य़ात हाच आता टीकेचा विषय बनला असून, सहा संशयितांच्या नाकरे चाचणीची परवानगी पोलिसांनी मागितली आहे. या सहा जणांमध्ये राजकीय पक्षाचा पदाधिकारी, नगर येथील एका संघटनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता आणि पिडीत जाधव कुटुंबातीलही तिघांचा समावेश असल्याचे समजते. त्यांच्या नाकरे चाचणीसाठी परवानगी मागणारा अर्ज पोलिसांनी शुक्रवारीच पाथर्डी येथील न्यायालयात दाखल केल्याचे समजते. मात्र त्याबाबतही गुप्तता पाळण्यात आली आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
ठाण्यामध्ये आंदोलने!