डॉक्टर, परिचारिकांसह ४४ जण विलगीकरणात

यवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णास करोनाची लागणी झाल्याने त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिकांसह ४४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. हा वृद्ध अर्धागवायूचा झटका आल्याने ५ एप्रिलपासून अतिदक्षता कक्षात उपचार घेत होता. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.

यवतमाळच्या इंदिरा नगरातील ६२ वर्षीय वृद्ध खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने ३ एप्रिलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता आला होता. त्यावेळी त्याला येथील अपघात कक्षात दाखल करण्यात आले. उपचारानंतर बरे वाटल्याने त्याला ४ एप्रिलला सुट्टी देण्यात आली. ५ एप्रिलला अर्धागवायूचा झटका आल्याने या वृद्धास पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळीसुद्धा त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने वार्ड क्र. १९ मध्ये दाखल करण्यात येऊन व्हेंटिलेटर लावण्यात आले. या रुग्णाच्या सर्व तपासण्या करून त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ इतर करोना संशयितांच्या नमुन्यांसोबत नागपूरला तपासणीसाठी पाठवण्यात आले. बुधवारी या वृद्धाचा अहवाल करोना ‘पॉझिटिव्ह’आल्याने वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ उडाली. या वृद्धास उपचार सुरू असलेल्या वार्डातून तत्काळ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या घटनेपासून वार्ड क्र. १९ व त्यापूर्वी अपघात वार्डात त्या वृद्धावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका दहशतीखाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या वार्डात सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ४४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. यात अपघात कक्षातील आठ वैद्यकीय अधिकारी, १२ निवासी डॉक्टर, २० परिचारिका, तंत्रज्ज्ञ, कक्षसेवक यांचा समावेश आहे. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याची माहिती डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली.

३३ हजार नागरिक गृह विलगीकरणात  ७८ पैकी ३१ जणांचे अहवाल नकारात्मक

यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेले आठ करोनाबाधितांनी शहरातील ज्या भागात वास्तव्य केले, त्या परिसरातील ३३ हजार नागरिकांना प्रशासनाने गृह विलगीकरणात ठेवले आहे.  शहरातील जाफरनगर, मेमन सोसायटी आणि इंदिरानगर येथे वावरल्यामुळे या क्षेत्राच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागात  सात हजार ७७८ घरातील ३३ हजार ४५ नागरिकांचे गृह विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्या हातावर शिक्का मारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रशासनाचा हलगर्जीपणा

या वृद्धास तो पहिल्यांदा आला तेव्हाच श्वसनाचा त्रास होता. त्याचवेळी त्याला विलगीकरण कक्षात पाठवून त्याची करोना चाचणी का केली नाही, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विलगीकरणात राहण्याची वेळ आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यातही हे अधिकारी, कर्मचारी, करोनाबाधित आणि संशयित हे सर्वजण एकाच वार्डात भरती आहेत. त्यांना वापरण्यासाठी एकच शौचालय असल्यानेही रोष व्यक्त होत आहे.