11 December 2017

News Flash

योगातील प्रज्ञा पाटील यांच्या विक्रमामुळे पंतप्रधानही चकीत

प्रज्ञा पाटील यांनी नुकतीच पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतली.

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: August 11, 2017 1:16 AM

योगासनांचे शिक्षण कुठे घेतले. अविरत योगासने करून जागतिक विक्रम करण्याची संकल्पना कशी सुचली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गुजरातची मुलगी असूनही पाटील आडनाव कसे.. असे प्रश्न पडले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. सलग १०३ योगासने करत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणाऱ्या प्रज्ञा पाटील यांनी नुकतीच पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतली. मूळच्या गुजरातच्या असणाऱ्या पाटील यांच्याशी जवळपास पंधरा मिनिटे पंतप्रधानांनी गुजराथी भाषेतून संवाद साधला.

गेल्या जून महिन्यात सलग पाच दिवस. तब्बल १०३ तास साधारणत: २५ योगासनांचा अविरत परिपाठ करत योग प्रशिक्षिका तथा उद्योजिका प्रज्ञा पाटील यांनी नव्या विश्व विक्रमाची नोंद केली. या यशानंतर अलिकडेच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. प्रज्ञा पाटील या मूळच्या गुजरातच्या. अहमदाबादमध्ये त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. यामुळे उभयतांमध्ये संपूर्ण संवाद गुजराथीमधूनच झाला. अविरत योगासनांद्वारे विश्वविक्रमाची संकल्पना कशी सुचली, याबद्दल पंतप्रधानांनी माहिती जाणून घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. शिक्षण कुठे व कसे झाले. योगासनांचे शिक्षण व मार्गदर्शक कोण याविषयीची माहिती देखील त्यांनी घेतली. योगासनात जागतिक विक्रम नोंदविल्यावर पुढे काय करण्याची मनिषा आहे, हे मोदी यांनी विचारल्यावर आपल्यासोबत या क्षेत्रात अधिक भरीव काम करण्याची इच्छा प्रगट केल्याचे नमूद केले. या भेटीत मोदी यांना गुजरातमधील मुलीचे आडनाव पाटील कसे हा प्रश्न पडला होता. त्यांनी गुजरातीमधून हा प्रश्न उपस्थित केला. मग पाटील यांनी माहेरी म्हणजे गुजरातमध्ये आपले गवांदे असणारे आडनाव लग्नानंतर पाटील झाल्याचे नमूद केले. म्हणजे आपण गुजरातची मुलगी तर महाराष्ट्राची सून असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.

First Published on August 11, 2017 1:16 am

Web Title: yoga world records pradnya patil narendra modi