राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली. ”राज्यपालांना कळलं पाहिजे की ते मुख्यमंत्री नाही. ते राज्यापाल असल्याचा त्यांना विसर पडला की काय? असा प्रश्न निर्माण होतो आहे. या राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न हे योग्य नाही.” असं यावेळी नवाब मलिक यांनी बोलून दाखवलं.

यावेळी नवाब मलिक म्हणाले की,  ”राज्यपालांशी संबंधित हा विषय आज कॅबिनेटमध्ये चर्चेला आल्यानंतर कॅबिनेटने नाराजी व्यक्त केली. मुख्य सचिवांना सांगण्यात आलेलं आहे की आपण स्वत: जाऊन, राज्यपालांच्या सचिवांना याबाबत अवगत करावं, की हे जे कार्यक्रम आहेत ते राज्य सरकारचे अधिकार आहेत, तुम्ही दुसरं सत्ता केंद्र असल्यासारखं वागत आहात हे योग्य नाही. कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव हे राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवाशी भेटत आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जो संदेश देण्यासाठी सांगितले आणि जी काही आज चर्चा झाली त्याची माहिती त्यांना देणार आहेत. हे पहिल्यांदा घडत नाही, करोना काळातही हे करोना परिस्थितिचा आढावा घेत होते. याबाबत केंद्रात तक्रार झाल्यानंतर ते थांबले आणि पुन्हा या पद्धतीने त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हे योग्य नाही. राज्य सरकार याबाबत नाराजी व्यक्त करते, कॅबिनेटने याचा विरोध केलेला आहे.

राज्यपालांकडून महाविकासआघाडीच्या अधिकारात वारंवार हस्तक्षेप – नवाब मलिक

तसेच, ”राज्यपाल कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना आता वाटत असेल की ते मुख्यमंत्री आहेत, तसं नाही त्यांना कळलं पाहिजे ते मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्याकडे असतात, ते राज्यपाल आहेत याचा त्यांना विसर पडला की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांना विद्यापीठांमध्ये जे काय करायचं आहे ते जाऊ शकतात, करू शकतात. कारण, ते नांदेड विद्यापीठाचे कुलपती आहेत.  परभणीच्या कृषी विद्यापीठाचा जो काही आढावा घ्यायचा आहे तो ते घेऊ शकतात. पण जे राज्य सरकारचे अधिकार आहेत, जे राज्य सरकारला अधिकार देण्यात आलेले आहेत त्याचे कुठेतरी हनन करणे हे योग्य नाही. आम्हाला अपेक्षा आहे की जी काही चूक झालेली आहे, माहिती देण्यात आल्यानंतर ते सुधारतील.” असंही यावेळी नवाब मलिक यांनी बोलून दाखवलं.