शेतीतला अनुभव व प्रयोगशीलता याचा मेळ साधल्यास गव्हासारखे पीकही एकरी तब्बल २४ क्विंटलचे उदंड माप बळिराजाच्या पदरात टाकू शकते. सलग तीन वर्षे वेगवेगळे प्रयोग करताना गव्हाची ‘शिवशांती’ ही नवीन जात विकसित करून निलंगा तालुक्यातील विष्णू शिवाजी चामे या तरुण शेतक ऱ्याने ही किमया करून दाखविली.
मराठवाडय़ात मुळातच गव्हाचे उत्पादन कमी होते. या पाश्र्वभूमीवर आनंदवाडीच्या विष्णू चामे (वय ४०) या शेतकऱ्याचा हा प्रयत्न गव्हाचे पीक घेणाऱ्या शेतक ऱ्यांना पर्वणी ठरावा. गव्हाचे देशात सरबती व बन्सी या दोन प्रकारचे पीक घेतले जाते. पहिल्या हरितक्रांतीत सरबती कुळातील वाण विकसित झाले. यात एचडी २१८९, कल्याण सोना, लोक वन, सोनालिका, एमएसीएस २४९६ ही वाणे अधिक उत्पादन देणारी व तांबेरा रोगास प्रतिबंधक आहेत. मात्र, राज्यात गव्हाचे सरासरी उत्पादन राष्ट्रीय उत्पादनापेक्षा कमी आहे. वेळेवर पेरणी न होणे, बीजप्रक्रियेचा अभाव, खत व पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, सेंद्रिय खताचा अभाव, अयोग्य जमिनीची निवड, प्रतिहेक्टरी रोपांची कमी संख्या, तण व उंदरामुळे होणारे नुकसान, एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनाचा अभाव आदी यामागील कारणे आहेत.
आधुनिक तंत्राचा अवलंब करूनही आतापर्यंत एकरी १० ते १२ क्विंटलच्या पुढे गव्हाचे उत्पादन मिळू शकलेले नाही. मात्र, विष्णू चामे यांनी या नवे काही करता येईल काय, याचा ध्यास घेत आपले नातेवाइक, मित्र यांच्यासह सांगली भागातून मोठी ठुशी दिसणारे बियाणे गोळा केले. त्यातून निवड पद्धतीने लावणी घेतली. पहिल्या वर्षी आलेल्या गव्हातील जोमदार दिसणाऱ्या पिकातील बियाणे निवडले. सलग ३ वष्रे हा प्रयोग करून जास्त फुटवे देणारी, उंचीला मध्यम, जमिनीवर न लोळणारी, रोगांना बळी न पडणारी जात विकसित केली. त्याचे अडीच किलो बियाणे तयार केले व १० गुंठय़ांमध्ये टोकन पद्धतीने लावून त्यापासून ६ क्विंटल उत्पादन काढले. या बियाण्यास आपल्या आई-वडिलांचे नाव, ‘शिव-शांती’ दिले.
गतवर्षी उशिराने थंडी पडल्याने १० डिसेंबरला शेतात गावरान खत, बीजप्रक्रिया करून टोकन पद्धतीने लागवण केली. पाण्याच्या पाच पाळय़ा दिल्या. तणनियंत्रणासाठी दोनदा खुरपण केले. खते व सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस दिला. एका ठिकाणी २२ ते २४ फुटवे तयार झाले. ठुशीची लांबी २२ सेंमी, तर एका ठुशीत १०० ते १०५ दाणे व त्याचे वजन १५ गॅ्रम भरले. चामे यांनी विकसित केलेली जात ११० दिवसांत दुपटीपेक्षा जास्त उत्पादन देते.
पुढील वर्षी शेतकऱ्यांना हे नवे बियाणे उपलब्ध करता येईल, या साठी कृषी अधिकारी रमेश चिल्ले मार्गदर्शन करीत आहेत. चामे यांच्या या प्रयोगामुळे जास्त उत्पादन देणारी जात उपलब्ध होणार असल्याने गव्हाचा पेरा व उत्पादनही निश्चितच वाढीस लागणार आहे.