पोलिसाच्या जाचाला कंटाळून दत्तनगर येथील नदीम पठाण या तरुणाने पोलीस चौकीसमोरच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. गंभीररीत्या भाजल्याने लोणी येथील रुग्णालयात औषधोपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.  मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे  तणावाचे वातावरण होते.

दत्तनगर येथील नदीम पठाण (वय २८)  या तरुणाने एका पोलीस कर्मचाऱ्याकडून छळ होत असल्याने औद्योगिक वसाहत  पोलीस चौकीसमोर अंगावर पेट्रोल ओतून  पेटवून घेतले होते. त्यात तो ८० टक्कय़ाहून अधिक भाजला होता. लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.  त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. पोलीस चौकीतील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करून संबंधित पोलिसाविरोधात गुन्हा नोंदवून निलंबित करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली. कारवाई करेपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. या प्रकरणातील संबंधित पोलिसाविरुद्ध गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. मात्र दुपारी चापर्यंत त्यातून मार्ग निघाला नव्हता. अखेर नदीमच्या आईचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक काळे यांनी दिले. त्यानंतर नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी लोणीला रवाना झाले.

पोलीस प्रशासन त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसाशी संबंधित नाजूक प्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा असून पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज सकाळी आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन गुजर, अहमद जहागीरदार, बाबासाहेब दिघे, राहुरीचे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल सय्यद, आरपीआयचे राजाभाऊ कापसे, भीमराज बागुल, सरपंच सुनील शिरसाठ, चांगदेव ढोकचौळे, नानासाहेब शिंदे, प्रेमचंद कुंकलोळ यांनी नदीमच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.