गौतम पाटील यांचे गौरवोद्गार

सांगली : लोकसत्ता लोकांकिकेच्या माध्यमातून नाटय़ क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या युवकांच्या कलागुणांना पलू पाडण्याचे काम होत असून अधिकृत प्रशिक्षण देणाऱ्यापेक्षा अभिनयाबरोबरच प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसादही या निमित्ताने युवकांना अनुभवण्यास मिळत असल्याचे मत ‘लोकरंगभूमी सांगली’चे संचालक गौतम पाटील यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयीन युवक वर्ग एकत्र येऊन वेगळे काही तरी मांडण्याचा प्रयत्न करीत असतात, अशा प्रयत्नांना पदार्पणातच समर्थ व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम  लोकसत्ता लोकांकिकेच्या स्वरूपात होत आहे. आजचा तरुण अधिक सजग झाला असून तो काळाच्या पुढची पावले ओळखण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप समाजाने द्यायला हवी असे सांगून श्री. पाटील म्हणाले की, शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या लोकरंगभूमीच्या माध्यमातूनही असे प्रयत्न करण्यात येतात.

कलाकार हा घडवून तयार होईलच असे नाही, त्यासाठी कलाकाराच्या अंगचे गुणही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजात घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांचे प्रतििबब कलात्मकतेच्या माध्यमातून समाजासमोर आणून समाज जागृती करण्याचे काम होत असते. यामुळे समाजापासून कला ही वेगळी असूच शकत नाही. तरुण वर्गातील समाजाबद्दलच्या भाव-भावनांना वाट मोकळी करून देण्याचे काम लोकांकिकेच्या व्यासपीठावरून होत आहे.

तरुणांना नाटकाच्या व्यासपीठावर व्यक्त होण्यासाठी केवळ अभिनय एवढेच क्षेत्र असत नाही, तर त्या अनुषंगाने नेपथ्य, संगीत, संहिता लेखन, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रासाठी दारे खुली होऊ शकतात. महाविद्यालयीन आयुष्य हे धावपळीचे आणि जीवनाबद्दल आशा आकाक्षांना मूर्त रूप देण्याचे वय असते. या वेळी कोणत्याही क्षेत्राबद्दल एक नैसर्गिक ओढ असते आणि या ओढीमुळे झोकून काम करण्याची मानसिकताही असते. यातून समाजाबद्दल आत्ममग्न मनाला काय वाटते हे सांगण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जातो. अंगभूत कला असणारे युवक तो मार्ग एकांकिकेच्या रूपाने स्वीकारतात.

या स्पर्धेच्या निमित्ताने नाटय़ क्षेत्रात नवीन काय आहे याची जाणीव तर होतेच, पण नव्या नजरेने यातील संहिता पाहण्याचे भाग्यही प्रेक्षक या नात्याने मिळते. सांगली ही नाटय़ चळवळीची जन्मभूमी मानली जाते. यामुळे सांगली-कोल्हापुरात सुरू असलेल्या नाटय़ चळवळीकडे एक प्रयोग म्हणून पाहिले जाते, त्याचबरोबर इथला प्रेक्षकही अधिक सजग असल्याने रुळलेल्या वाटेने न जाता नवीन वाट कोण तयार करतो याकडेही प्रेक्षकाबरोबरच या क्षेत्रातील लोकांचे लक्ष असते. ही नवी वाट दाखविण्याचे काम लोकसत्ता-लोकांकिकेच्या माध्यमातून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.