व्हाईटनर प्राशन करून आत्महत्येसाठी रेल्वे रूळावर आलेल्या तरुणामुळे तीन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. नागरिकांनी समजूत काढूनही तरुण रेल्वे रूळाकडे जात असल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांनी बोलावले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. औरंगाबाद शहरात ही घटना घडली.

व्हाईटनर प्राशन केलेला एक तरुण आत्महत्या करण्यासाठी औरंगाबादमधील देवानगरी येथील रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ आला. परिसरातील नागरिकांनी त्या तरुणाला रोखण्याचे प्रयत्न केले. रेल्वे रूळावर गर्दी दिसल्याने येत असलेली ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेस थांबवण्यात आली. यादरम्यान, नागरिकांनी तरुणांची समजूत काढली. घरी जातो, असे सांगून तो घटनास्थळावरून निघून गेला. मात्र, थोड्या वेळाने पुन्हा तेथे आला. यावेळी नगरसोल-नांदेड गाडी जात असताना समोर येऊन उभा राहिला. रेल्वे थांबून काहीजणांनी त्याची समजूत काढली. तो परत गेला आणि थोड्या वेळाने मनमाड-काचिगुडा रेल्वे गाडीसमोर येऊन थांबला. त्यानंतर नागरिक आणि प्रवाशांनी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी सदरील तरुणाला ताब्यात घेतले. तोपर्यंत हा गोंधळ सुरूच होता. या तरुणाकडील जवळपास चार हजार रूपये आणि मोबाईल काही मुलांनी काढून घेतला. तसेच त्याच्या अंगावर खाज येणारी काचकुरीही टाकली, असे त्या तरूणाने चौकशीत सांगितले. त्यामुळेच तो आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरूळावर आला होता. त्याच्या या आत्महत्येचा गोंधळ तासभर चालल्याने तीन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक मात्र, विस्कळीत झाले.