News Flash

ज्ञानेश्वर साळवे चिडला, कारण की..!

हातातोंडाचा मेळ बसत नसल्याने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

हातातोंडाचा मेळ बसत नसल्याने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

साडेतीन एकर कोरडवाहू शेती, वडील गतिमंद असल्यामुळे कुटुंबाची ससेहोलपट, सोयाबीनला मिळालेला नीचांकी भाव, कष्ट करूनही घरातील हातातोंडाचा मेळ बसत नसल्यामुळेच थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून आपल्या दुखाचा कडेलोट करण्याचा प्रयत्न तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने केला. सोयाबीन विक्रीतून मोठा फटका बसल्यामुळेच राग अनावर झाल्याची प्रतिक्रिया त्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

उस्मानाबाद जिल्ह्य ठिकाणापासून मसला हे ३५ किलोमीटर अंतरावरील गाव. मसला येथील ज्ञानेश्वर साळवे या महाविद्यालयीन तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. ज्ञानेश्वर याच्या घरात एकूण पाच सदस्य. आई, वडील, मोठी बहीण, तिचे लहान मूल आणि तो स्वत राहतात. केवळ साडेतीन एकर शेतीतून या पाच जणांच्या उदरनिर्वाहाची कसरत त्याच्या आईला करावी लागते. वडील गतिमंद असल्यामुळे येणारा ताण वेगळा. लग्नानंतर नवऱ्याने झिडकारल्यामुळे माहेरी राहणाऱ्या बहिणीची जबाबदारी देखील त्याच्यावरच आहे.

यंदा साडेतीन एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली. पावसाने ओढ दिल्यामुळे तुरळक उगवलेल्या सोयाबीनचे सोळा कट्टे उत्पन्न ज्ञानेश्वरला मिळाले. मात्र, रब्बीचा पेरा करण्यासाठी दुसरी कोणतीही सोय नसल्यामुळे सरकारच्या हमीभाव केंद्रावर हेलपाटे मारण्याऐवजी खुल्या बाजारात नाइलाजाने सोयाबीन विकावे लागले. खुल्या बाजारात अत्यंत नीचांकी किमतीने सोयाबीन विकावे लागल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यातूनच ज्ञानेश्वर साळवे याचा राग अनावर झाला.

खर्च २६ हजार, उत्पन्न १९ हजार

साडेतीन एकरात आठ क्विंटल सोयाबीन हाती लागले. खुल्या बाजारात दोन हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलने व्यापाऱ्यांनी लुबाडले. नांगरणी चार हजार २००, कुळवणी दोन हजार ८००, कोळपणी दोन हजार ८००, पेरणी दोन हजार ८००, दोन पिशव्या बियाणाचे चार हजार, फवारणीपोटी एक हजार ५००, भरडणी, काढणी, वाहतूक भाडे यापोटी सात हजार असा सुमारे २६ हजारांहून अधिक खर्च आणि उत्पन्न केवळ १९ हजार ५००. सरकारच्या खरेदी केंद्रावर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महिनाभर वाट पाहावी लागते. पेरणीचा हंगाम तोवर निघून जातो. त्यामुळे नाइलाजाने नुकसान सहन करून व्यापाऱ्याच्या हातात मोठय़ा कष्टाने उत्पादित केलेले धान्य घालण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता.

आई, बहिणीची मुंबई वारी; पोलिसांनी घेतले ताब्यात

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून ज्ञानेश्वर साळवे याचे आंदोलन संबंध महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर पोलीस प्रशासन तत्काळ कामाला लागले. तामलवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन त्याची आई आणि बहीण यांना ताब्यात घेऊन मुंबईच्या दिशेने खासगी वाहनातून कूच केली. रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ज्ञानेश्वर याचा ताबा त्याच्या आईकडे देऊन हात वर केले. उस्मानाबादच्या पोलीस अधिकाऱ्याने पहाटे चार वाजता मुंबईहून निघून दुपारी दोन वाजता या सर्वाना मसला येथे सुखरूप सोडले. दरम्यान, गतिमंद असलेल्या ज्ञानेश्वर याच्या वडिलाला सुरू असलेल्या या सगळ्या धावपळीचा थांगपत्ताही नव्हता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:22 am

Web Title: youth attempts suicide in mantralaya
Next Stories
1 सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा कोमात
2 जिवंतपणीच आईच्या नशिबी स्मशानातले जगणे!
3 मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, प्रचंड वाहतूक कोंडी
Just Now!
X