वाई : फलटण येथे व्याजाने दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण करून सिगारेटचे चटके देत बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार काल फलटण येथे घडला. नितीन रमेश चांडक (वय ३२, रा. मारवाड पेठ, फलटण) असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमी युवकास सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

युवराज किसन पवार व प्रसाद किसन पवार (रा. सोमवार पेठ, फलटण) व त्यांच्या तीन साथीदारांनी हे कृत्य केल्याचे चांडक यांचे म्हणणे आहे. फलटणच्या मारवाड पेठेत नितीन चांडक यांची पत्नी शिक्षिका आहे, तर ते फटाका विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी सहा वर्षांपूर्वी पवार याच्याकडून फटाका स्टॉलसाठी ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या पोटी त्यांनी १ लाख ३७ हजार रुपये परतही केले. तरीही मुद्दल बाकी असल्याचे सांगत पवार त्यांना त्रास देत होता. काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते बारसकर चौकात थांबले होते. या वेळी पवार साथीदारांसह चारचाकी गाडीतून तेथे आला. त्याने चांडक यांना बोलावून घेतले. मुद्दल अजून दिले नाहीस म्हणत गाडीत बसायला लावले. नकार दिल्यावर गाडीतील चौघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढले. त्यानंतर गाडी मिरगाव फाटा तसेच मुधोजी कॉलेजच्या पाठीमागील बाजून नेण्यात आली. तेथे त्यांना दगड, रॉड, काचेच्या बाटल्यानी गंभीर मारहाण केली. तसेच सिगारेटचे चटकेही दिले. त्यानंतर त्यांच्या पत्नीलाही फोनवरून दमदाटी करण्यात आली. मारहाण केल्यानंतर त्यांनी चांडक यांना जिंती नाक्यावर फेकून दिले. तेथून चांडक यांनी पत्नीला फोनवरून माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक त्यांना घेऊ न फलटण शहर पोलिस ठाण्यात गेले. मात्र, तक्रार घेण्यात आली नाही. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना फलटण येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथून त्यांना उपचारासाठी पहाटेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.