सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या युवक काँग्रेसचा कार्यकर्ता कुडाळ सांगीडेवाडी येथील भूषण विजय राणे (२५) याला एमपीडीए अंतर्गत एक वर्षांसाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.
त्याची रवानगी रत्नागिरी येथील कारागृहात करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई होण्याचा पहिलाच प्रसंग आहे. कुडाळचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. आता राणे एका वर्षांसाठी रत्नागिरी कारागृहात स्थानबद्ध राहणार आहे.
या कारवाईविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचा हक्क राणे याला आहे. शासनाच्या झोपडपट्टीदादा विरोधात करावयाच्या कारवाई अंतर्गत कायद्यानुसार त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. कुडाळ नगर पंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आणखी काही दादागिरी करणाऱ्यांविरोधात कारवाई होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.