काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

‘रामदेवबाबा काले धन का क्या हुआ, रामदेवबाबा लोकपाल बिल का क्या हुआ, रामदेव बाबा चले जाव’ अशा घोषणा देत बाबा रामदेव यांचा जाहीर निषेध नोंदवत त्यांना वरोरा काँग्रेसच्या वतीने काळे  झेंडे दाखवण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसने बाबा रामदेव यांचा अशा पद्धतीने निषेध नोंदवल्याने काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांना वरोरा पोलिसांनी ताब्यात घेतले.

स्वामी रामदेवबाबा गेल्या चार दिवसांपासून या जिल्हय़ात मुक्कामी आहेत. सलग तीन दिवस त्यांनी मूल येथे योगाभ्यास शिबीर, त्यानंतर कृषी मेळावा व चंद्रपूरला महिलांचे महासंमेलन घेतले. या दौऱ्यात रामदेव बाबा यांनी योग साधनेसोबतच पतंजलीच्या सर्व वस्तूंचे मार्केटिंग केले. एकूणच हा पतंजलीच्या मार्केटिंगचा दौरा राहिला, अशी टीका सर्व स्तरातून होत आहे. अशातच आज बाबा रामदेव कृषी व शेतकरी मेळाव्यासाठी म्हणून वरोरा येथे जात होते. वरोरा येथे त्यांचे आगमन होताच वरोरा शहर काँग्रेसच्या वतीने बाबा रामदेव यांचा जाहीर निषेध नोंदवून रत्नमाला चौकात काळे झेंडे दाखवून घोषणा दिल्या.

काँग्रेसचे नेते डॉ. विजय देवतळे, डॉ. आसावरी देवतळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

वरोरा पोलिसांनी याप्रकरणी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. विशेष म्हणजे, काल बुधवारी महिला मेळाव्याला रामदेव बाबा चांदा क्लब ग्राऊंड येथे येत असताना काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला गेला.

तसेच महिला काँग्रेसच्या वतीनेही बाबा रामदेव महिलांना मार्गदर्शन करण्याऐवजी पतंजलीच्या सर्व ब्रँडचे जोरदार मार्केटिंग करीत आहेत, असाच आरोप केला गेला.

कृषी मेळाव्याला रामदेव बाबा यांची भेट

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे वरोराच्या वरखडे लेआऊट येथे जिल्हास्तरीय कृषी मेळावा व प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर या मेळाव्याला बाबा रामदेव यांनी हजेरी लावली. यावेळी सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे प्रामुख्याने उपस्थित होते. मेळाव्यात रामदेव बाबा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.