उस्मानाबाद जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत असून, आज संसर्ग झाल्यानं चौथा बळी गेला. उस्मानाबाद शहरातील धारासूरमर्दिनी मंदिर परिसरात एका कॅन्सरग्रस्त तरुणाला करोनाचा संसर्ग झाला होता. उपचार सुरू असतानाच त्या तरुणाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात करोनामुळे चौथा बळी गेला आहे.

शहरातील धारासूरमर्दिनी मंदिर परिसरातील हा तरुण मुंबई येथून आलेला होता. सदरील तरूण आधीच ब्लड कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होता. त्यात त्याला करोनाची बाधा झाली. करोना झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींचाही स्वॅब घेण्यात आलेला होता. सुदैवाने त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

या तरुणाच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या चार झाली आहे. जिल्ह्यात सध्या एकुण करोनाबाधितांची संख्या १४२ पर्यंत पोहचली आहे. यातील ९९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर ४० जणांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील स्थिती…

महाराष्ट्रात आज (१३ जून) ३,४२७ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ११३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद गेल्या चोवीस तासांमध्ये करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १,५५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ५१ हजार ३७९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४९ हजार ३४६ करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोना रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या आता १ लाख ४ हजार ५६८ इतकी झाली आहे.