आंबोली येथे वर्षां पर्यटनासाठी कर्नाटक बेळगावहून आलेला १९ वर्षांचा तरुण पूर्वीचावस देवस्थानकडील धबधब्याशेजारी लघुशंकेस गेला असता ९० फूट खोल दरीत कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाल्याने तो ठार झाला. त्याला दरीतून बाहेर काढण्यात आले आहे.

कर्नाटक-बेळगाव येथील बैलहोंगल गावातील १९ वर्षीय रुद्राप्पा विठ्ठल बजेरी आपल्या मित्रासमवेत वर्षां पर्यटनासाठी आंबोलीत आला होता. वर्षां पर्यटन करत असताना हा तरुण दुपारी लघुशंकेस गेला. त्यावेळी पाय घसरून खोल दरीत कोसळला. तेथेच तो ठार झाला. आंबोली घाटातील पूर्वीचावस देवस्थान आहे. तेथे शेजारीच असणाऱ्या दरीच्या टोकावर लघुशंका करत असताना या तरुणाचा पाय घसरून तोल दरीत गेला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापती झाल्या. हा प्रकार दुपारी घडला.

बैलहोंगल येथील बारा ते तेरा तरुण वर्षांपर्यटनासाठी आंबोलीत दाखल झाले होते. ते वर्षांपर्यटन स्थळी आल्यावर हा दुर्दैवी प्रकार घडला. त्याची खबर संजय तुरुमुरी यांनी  पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शंकर पाटील, हवालदार गजेंद्र भिसे, गुरुनाथ तेली यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या खोल दरीत उतरून आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र भिसे, नर, गुरुनाथ तेली, गजानन देसाई, सैनिक स्कूलचे शिक्षक नागेश भोसले, सतीश आहीर, अजित नार्वेकर यांनी मृतदेह दोरखंडाच्या साहाय्याने बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

आंबोली घाटात तरुण कोसळून ठार झाल्याची माहिती मिळताच पर्यटकांमध्ये जोरदार गडबड उडाली. पोलिसांनीदेखील दक्षता घेतली. पर्यटकांची शनिवारीदेखील आंबोलीत गर्दी होती. आंबोलीत वर्षांपर्यटनाला मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. उत्साही, तसेच मद्यपी पर्यटकावर नियंत्रण ठेवणे पोलिसांना कठीण होत आहे. यंदा पर्यटकांची गर्दी दैनंदिनी होत असून शनिवार व रविवारी गर्दीचा उच्चांक गाठला जात आहे. त्यात हौसे-गौसे पर्यटकांची गर्दी पोलीस नियंत्रणात आणत आहेत, पण वर्षांपर्यटनाची मस्ती जीवावर बेतण्याची भीती सर्वानाच आहे.