कोणत्याही व्यवसायात असणारी अनिश्चितता आणि तीव्र स्पर्धा कला क्षेत्रातही अपवाद ठरू शकत नाही. वशिलेबाजीने कधीही यशस्वी कलावंत होता येत नाही, तर त्याला प्रबळ इच्छाशक्तीची व अपार मेहनतीची समर्पक जोड असावी लागते. त्यामुळे स्वत:च्या कलेचे रूपांतर व्यवसायात करा, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी तरुण कलाकारांना दिला. युवक महोत्सवाच्या माध्यमातून उत्कृष्ट व्यावसायिक कलावंत घडावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, केंद्रीय युवा महोत्सवात विद्यापीठाने १३ पारितोषिके पटकावली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित या महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. कुलगुरू प्रा. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. तरुणाईला मार्गदर्शन करताना अतुल कुलकर्णी म्हणाले, की आयुष्यात ज्या वयात जी गोष्ट करायची ती तेव्हाच केली, तरच जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते. तारुण्य हे स्वत:च्या प्रतिमेला व करिअरला निर्णायक वळण देणारे असते. या वयात शिक्षणावर प्रेम करा. स्वत:च्या छंदाचे, कलेचे रूपांतर व्यवसायात होऊ द्या. आपली कलेची आवड, कलेचा दर्जा व कलेचे व्यवसायात रूपांतर करणे ही यशस्वी कलावंत होण्यासाठीची त्रिसूत्री आहे.
पुढील शैक्षणिक वर्षांपासून जून ते मार्चदरम्यान होणारे विविध कला, क्रीडा महोत्सव स्पर्धा यांचे अॅकॅडमिक कॅलेंडर बनविण्यात येईल, असे कुलगरू चोपडे यांनी सांगितले. आगामी काळातही केंद्रीय युवा महोत्सव घेण्यात यईल. कलावंतांसाठी कायमस्वरूपी रंगमंच उभारणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी प्रास्ताविक, तर डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
विद्यापीठाला १३ पारितोषिके
महोत्सवात विद्यापीठाला १३ पारितोषिके मिळाली. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अपेक्षा निर्मळ (लावणी), उत्कृष्ट अभिनय गजमल भागवत (‘मसणातील सोनं’ एकांकिका), पोस्टर, मूदमूर्तीकला यात प्रथम;  लोक वाद्यवृंद, लोक/आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य, कोलाज, इन्स्टॉलेशन, लावणी या प्रकारात द्वितीय क्रमांक, तर प्रहसन, व्यंगचित्रकला यात तिसरा क्रमांक मिळवला. नृत्य गटात उत्कृष्ट संघ म्हणून विद्यापीठाची निवड करण्यात आली.