अनधिकृत घर असल्याचे कारण देत पाणी बंद केले

हेमेंद्र पाटील, बोईसर

पालघर तालुक्यातील सालवड ग्रामपंचायत हद्दीत एका कुटुंबाचे १२ वर्षांनंतर अनधिकृत घर असल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने पिण्याचे पाणी बंद केल्याचा प्रकार घडला आहे. अनेक वर्षांपासून घरपट्टी भरत असतानाही ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद केला आहे.  सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे हा प्रकार करणार असल्याचा आरोप पीडित युवकाने केला आहे.

सालवड ग्रामपंचायत हद्दीत एका खासगी जागेवर सन २००८ पासून संतोष भोणे हा युवक आपल्या कुटुंबासह छोटेसे घर बांधून राहत आहे. घराची जागा येथील जमीन मालकाने संतोष यांचे वडील काम करत असताना त्यांना देण्यात आली होती. या ठिकाणी बांधलेल्या घराला त्या वेळी ग्रामपंचायतीने घरपट्टी आकारून नळ योजनेतून पाणीपुरवठा दिला होता. मात्र जागेचा सातबारा मूळ मालकांच्याच नावेच राहिल्याने राजकीय वजन असलेल्या त्यांच्या वारसाने येथील लोकांना हुसकावून लावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मार्फत पाणीपुरवठाच बंद केल्याचा प्रकार केला असल्याचा आरोप होत आहे. पीडितांनी गटविकास अधिकारी पालघर यांच्याकडे तक्रार करूनदेखील आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

सालवड ग्रामपंचायतीने गेल्या १२ वर्षांपासून येथील कुटुंबाला घरपट्टी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायत करआकारणी पुस्तकात देखील घर अनधिकृत असल्याचे कोणत्याही प्रकारची नोंद नाही. गेल्या अनेक वर्षांपासून राहात असलेल्या घराची जागा मालकी हक्क दाखवणाऱ्या व्यक्तीने दुर्लक्ष केले होते. मात्र ग्रामपंचायतीवर सत्ता आल्यावर राजकीय दबावाने थेट पहिला पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांने घराची दुरुस्ती सुरू झाल्यावर घर अनधिकृत असल्याची नोटीसच ग्रामपंचायतीने अचानक दिल्यांने संपूर्ण कुटुंबातील सदस्य भीतीच्या छायेत जगत आहेत. यातच येथील खासगी मालकी जागेवर इतरही अनेकांनी घरे बांधली असताना फक्त एकच घराचा पाणीपुरवठा बंद केल्याने या मागे जातीय राजकीय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अनधिकृत बांधकामांना नळजोडणी

सालवड ग्रामपंचायत हद्दीत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली असून काही ठिकाणी सरकारी जागेवर देखील अतिक्रमणे झाली आहेत. केलेल्या बांधकामांना ग्रामपंचायतीने नळजोडणी दिली आहे. या भागात निम्म्यापेक्षा अधिक बांधकामे अनधिकृत असताना अशा बांधकामांना मात्र नियमबाह्य़ पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे घर अनधिकृत असल्याचे कारण देत पाणीपुरवठा बंद केला जातो, तर दुसरीकडे ग्रामपंचायत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या अनधिकृत बांधकामांना नळजोडणी देत असल्याचे दिसून येते.

ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या पतीच्या नावाने जमीन असल्याने  पदाचा दुरुपयोग करून आमचे पिण्याचे पाणी बंद केले आहे. या ठिकाणी अनेक लोकांची अतिक्रमणे असतानादेखील त्यांना पाणीपुरवठा केला जातो. याबाबत ग्रामपंचायतीत तक्रार करूनदेखील गटविकास अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.

 – संतोष भोणे, ग्रामस्थ सालवड

येथील जमीन मालकाने घेतलेल्या हरकतीमुळे या ठिकाणी बांधलेल्या घरांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

 – राजाराम बागूल,  ग्रामविकास अधिकारी सालवड