‘पबजी गेम’मधील टास्क पूर्ण न झाल्यामुळे चंद्रपूर जिलह्यातील माजरी येथील गौरव शामराव पाटेकर या १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गौरव पाटेकर हा नागपूर येथील रायसोनी कॉलेजमध्ये बी. कॉम. प्रथम वर्षांत शिकत होता. लॉकडाउनच्या काळात तो गावाकडे आला होता. मागील पाच महिन्यापासून आई-बाबांसोबत तो राहत होता.

१९ वर्षीय गौरव लॉकडाउनमध्ये दिवसरात्र ‘पबजी गेम’ खेळत होता. गेम खेळत असताना टास्क पूर्ण न झाल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री त्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी गौरवनं माथनकर नावाच्या आपल्या एका मित्राला रात्री एक वाजता फोन केला होता. मी आता जातोय असं त्यानं फोनवर म्हटलं होतं. त्यानंतर माथनकरने गौरवच्या मोठ्या भावाला फोन करुन सूचित केलं होतं. फोन कट झाल्यानंतर तो गौरवच्या खोलीत गेला होता. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला होता.

सतत होणाऱ्या आत्महत्यामुळे भारतात ‘पबजी गेम’ला बंदी आणण्यात यावी, अशी मागणी पालक करीत आहेत. माजरी पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या म्हणून रिपोर्ट नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास सदाशिव ढाकने यांच्या मार्गदर्शनाखाली विजय चिकनकर करत आहेत.