मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे ही तुमची हक्काची शहरं आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण तरुणांचा आणि जनतेचा या मुख्य शहरांवर पहिला हक्क आहे. त्यामुळे इथं हक्काने या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील तरुणांना केले आहे.


धुळे येथे मनसेच्या मेळाव्यात रविवारी राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, “मी काही फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी धुळ्यात आलेलो नाही, तर ज्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना शहराबाबत आस्था वाटते, शहरात काही रचनात्मक घडवायचं आहे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांना संधी देण्यासाठी मी इथं आलो आहे.

राजकारणातील इच्छुकांकडे जर आपल्या शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासाचा आराखडा नसेल तर निवडणुका का लढायच्या?, असा खडा सवाल यावेळी राज यांनी उपस्थितांसमोर केला. तसेच मतदारांच्या मानसिकतेवर बोट ठेवताना ते म्हणाले, निवडणुकांमध्ये जर फक्त पैशांनाच महत्त्व असेल, कामाला नसेल तर कसला विकास होणार आहे.

दरम्यान, नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका करताना राज म्हणाले, राजीव गांधींना जसं १९८४ साली बहुमत मिळालं त्यानंतर ३० वर्षांनी मोदींच्या हातात बहुमत आलं. मात्र, या बहुमताच्या जोरावर त्यांनी फक्त नोटाबंदी केली. या निर्णयामुळे फक्त नोटांचा रंग सोडला तर काय बदललं आपल्या देशात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितांना विचारला.