रेल्वे अपघातांचे वाढलेले प्रमाण, त्यात होणारी जीवितहानी, आर्थिक नुकसान हे घटक लक्षात घेऊन, अलिबागच्या हर्षल मंगेश जुईकर या विद्यार्थ्यांने आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल तयार केले आहे. लोकल, मेल या मल्टिपल रेल्वे ट्रॅकवर विनाचालक धावणाऱ्या रेल्वेसाठी हे मॉडेल उपयुक्त ठरणार आहे. हर्षलने बनविलेल्या या प्रकल्पाची सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे. त्याचे हे मॉडेल बघून गूगलने फेलोशिप दिली आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयानेही त्याच्या या मॉडेलची दखल घेतली आहे.

हर्षल जुईकर हा अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागात शिक्षण घेत आहे. पहिल्यापासून त्याला संगणकात विशेष रुची आहे. त्याचाच वापर करून त्याने आजवर अनेक लहान मोठे प्रकल्प राबविले आहेत. विद्यापीठाच्या प्रकल्पात त्याने आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल आपल्या मित्राच्या सोबतीने बनविला होता. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले होते. या त्याच्या मॉडेलसाठी प्राचार्य अनिल पाटील, आयटी विभागप्रमुख सुरेंद्र दातार, शिक्षक सत्यजीत तुळपुळे, सचिन भोस्तेकर, अवंती जोगळेकर, चैताली चौधरी यांनी सहकार्य केले होते.

आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे मॉडेल बनविण्यासाठी त्याने चर्चगेट येथे जाऊन मोटरमन, स्टेशन मास्टर, टीसी, रेल्वे कंट्रोल रूममध्ये जाऊन माहिती गोळा केली. त्यानंतर इटली येथून सेन्सर मागवून स्वत:चे मॉडेल तयार केले. गूगल फेलोशॉपी परीक्षेसाठी हर्षलने आपले मॉडेल पाठविले होते. यात जगभरातून तीन लाख प्रकल्प सादर करण्यात आले होते. यातून हर्षद जुईकर यांच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे देशाभरातून गूगलने  निवडलेल्या प्रकल्पात हर्षलचा प्रकल्प दुसऱ्या क्रमांकावर आहे. गूगलने त्याला फेलोशिप दिल्याचे पत्र पाठविले आहे. त्याचा शिक्षणाचा पूर्ण खर्च गूगलकडून करण्यात येणार असून दोन महिने सेंट फ्रान्सिको (कॅलिफोर्निया) येथे जाण्यायेण्याचा खर्चही गूगलमार्फत केला जाणार आहे. केंद्रानेही हर्षलच्या मॉडेलची दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने त्याचे मॉडेल आत्मनिर्भर भारत अंतर्गत मागवून घेतले आहे.

मॉडेलची वैशिष्टय़े

* स्वयंचलित ट्रेन ही यंत्रणा कार्यान्वयित करता येऊ  शकते. यामुळे अपघात टळण्यास मदत होईल. जीवितहानी टळेल, आर्थिक नुकसान टळेल आणि वेळेची बचत होईल. सेन्सर यंत्रणेद्वारे संभाव्य अपघाताची माहिती एक किलोमीटर आधीच कळू शकेल.

* रेल्वे अपघात, जीवितहानी, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स मॉडेलचा उपयोग रेल्वेला होणार आहे. लोकल, मेलसाठी मल्टिपल रेल्वे ट्रॅकवर या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.’

–  हर्षल मंगेश जुईकर, युवा संशोधक