औरंगाबाद शहरातील रहदारी असलेल्या कामगार चौकापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर चारचाकीने चिरडून एका तरूणाची हत्या करण्यात आली. भर दिवसा हा प्रकार घडला त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. संकेत कुलकर्णी असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याला चारचाकीने चिरडण्याआधी त्याचा संकेत जायभाय या तरूणासोबत त्याचा जुना वाद उफाळून आला. संकेत जायभाय आणि संकेत कुलकर्णी यांचा वाद बाचाबाची पर्यंत वाढला आणि विकोपाला गेला.

यानंतर संकेत जायभाय या तरूणाने संकेत कुलकर्णीला धक्काबुक्की केली. तसेच त्याला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ओढत घेऊन गेला. त्या ठिकाणीही या दोघांमध्ये झटापट झाली. वाद मिटला असे वाटत असतानाच संकेत जायभायने संकेत कुलकर्णीला चारचाकीची धडक दिली. पहिल्या धडकेत संकेतच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याने पुन्हा संकेतला धडक दिली आणि भिंतीजवळ त्याला चिरडले. या झटापटीत संकेतचे काही मित्र जखमी झाले तर संकेत कुलकर्णी हा गंभीर जखमी झाला. संकेत कुलकर्णी गंभीर जखमी झाल्याने त्याला घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता कारण डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केले.

संकेत जायभाय आणि संकेत कुलकर्णी या दोन तरूणांमध्ये रंगलेला वाद लोक बघत उभे होते. त्यांच्यापैकी कोणीही या दोघांना जाऊन समजावले नाही. संकेत कुलकर्णी शिक्षणासाठी पुण्याला रहात होता. परीक्षा संपल्यामुळे तो औरंगाबादला आला होता. औरंगाबादला त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते त्यामुळे तो आपल्या इतर मित्रांसोबत बाहेर गेला होता तेव्हा संकेत जायभायने या तरूणाला गाठले आणि जुना वाद उकरून काढला. तसेच पुढे दोघांमध्ये झटापट झाली आणि क्षुल्लक कारणावरून संकेतला जीव गमवावा लागला.

संकेत जायभाय या घटनेनंतर फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर संकेत कुलकर्णीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संकेतच्या मित्रांच्याही साक्षी नोंदवण्यात येत आहेत तसेच याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचीही प्रक्रिया सुरु आहे असेही समजते आहे. संकेत जायभायच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.