News Flash

गावाला रस्ता नसल्याने संसारमार्गात अडथळे

वैतरणा आणि विरार स्थानकाच्या मध्ये एक सागरी बेट आहे या बेटावर वाढीव आणि सरावली ही गावे आहेत.

वाढीव-सरावली गावातील तरुणांना लग्नाचे स्थळ येईना

प्रसेनजीत इंगळे, विरार

विरारच्या वेशीवर असलेल्या वाढीव-सरावली गावातील तरुणांना सध्या लग्नाची चिंता सतावत आहे. या गावातील फक्त मुलींना स्थळ चालून येत असली तरी तरुणांना स्थळ घेऊन येणाऱ्यांच्या रस्त्याकडे डोळे लावून बसावे लागत आहे. गावाला रस्ताच नसल्याने लग्नासाठी मुलगी देण्याचे धाडस कुठल्याही मुलीच्या पित्याने दाखवलेले नाही. यामुळे या गावातील ७० ते ८० तरुण आजही अविवाहित आहेत.

वैतरणा आणि विरार स्थानकाच्या मध्ये एक सागरी बेट आहे या बेटावर वाढीव आणि सरावली ही गावे आहेत. ग्रुप ग्रामपंचायतीच्या आधिपत्याखाली ही गावे येत असून या गावांची लोकसंख्या जवळ जवळ २००० च्या घरात आहे. पण गाव वसल्यापासून मूलभूत सेवा सुविधांपासून वंचितच राहिली. या गावात जाण्यासाठी आजही कोणताच रस्ता नाही, यामुळे येथील लोकांना ये-जा करण्यासाठी रोज आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. या गावांना वैतरणा खाडीवरील ४०० मीटरचा रेल्वे पूल ओलांडून ये-जा करावी लागते. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे पूल Rमांक ९२ आणि ९३ या पुलावरून रोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. अशातच गावातील महिला, शाळकरी मुले, चाकरमानी रोज भाकरीच्या लढाईसाठी जीवघेणा प्रवास करत आहेत. आतापर्यंत शेकडो गावकरी या पुलांचे बळी ठरले आहेत. पण आजतगायत गावासाठी कोणतीही सोय प्रशासनातर्फे करण्यात आली नाही. गावातील समस्या इथेच संपत नाहीत. या गावात लोकांना पिण्याचे पाणी नाही कोणत्याही आरोग्य सुविधा नाहीत, दळणवळणाची साधने नाहीत, शाळा नाही, विजेचा लपंडाव सतत सुरू असतो. या सर्व असुविधांमुळे महिलांना विशेष त्रास सहन करावा लागतो. यामुळे येथे लग्नासाठी मुलगी देण्याचे कुणी धाडस करत नाही. गाव सोडून जर कुणी तरुण राहायला तयार झाला तरच त्याचे लग्न होते. पण प्रपंचाची नाळ गावाशी जोडली असल्याने आणि आर्थिक गणित जुळत नसल्याने तरुणही गावाबाहेर जाऊ  शकत नाहीत. यामुळे त्यांचे लग्न होत नाही.

या समस्यांच्या संदर्भात गावकरी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. पण त्यांच्या पदरी केवळ अपयश पडते. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी या गावाला भेट देऊन येथील समस्यांचे निवारण करण्याचे सांगितले होते. पण ते प्रस्तावसुद्धा धूळ खात पडले आहेत. गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचीसुद्धा भेट घेतली होती. पण केवळ आश्वासनाने गावकऱ्यांचे समाधान करण्यात आले.

आज गावातील तरुण लग्नापासून वंचित होत चालले आहेत. अनेकांचे लग्नाचे वय निघून गेले आहे. पण येणाऱ्या तरुणांची तरी लग्न व्हावीत, गावात लोकांनी लग्नासाठी मुली द्याव्यात यासाठी येथील तरुण शासनाच्या दारी चकरा मारत आहेत.

मी गावाचा उपसरपंच आहे, पण माझासुद्धा विवाह झाला नाही, गावात रस्ता नसल्याने कोणीच मुलगी देण्याचे धाडस करत नाही.

-प्रफुल्ल भोईर, ग्रामस्थ

गावचे नाव उच्चारताच मुलीकडील मंडळी लग्नाला नकार देतात. म्हणूनच गावासाठी पादचारी पूल असणे गरजेचे आहे.  

– अमित पाटील, ग्रामस्थ

या गावाची प्रशासनाने दखल घेतली आहे, सध्या गावाला पर्यायी मार्ग म्हणून फेरीबोटची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे, तसेच पुलाचा प्रस्तावही तयार केला जाईल.

 -किरण महाजन, उपजिल्हाधिकारी, पालघर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 2:25 am

Web Title: youth living in village without road near virar not getting marriage proposal zws 70
Next Stories
1 नेतृत्वाअभावी रायगडमध्ये काँग्रेसची वाट बिकट
2 सांगलीत महापुरामध्ये २६ जणांचा मृत्यू
3 ९३ वर्षीय वडिलांचा सांभाळ करण्यासाठी दरमहा पाच हजार रुपये देण्याचे आदेश
Just Now!
X