परिसरात तणावाचे वातावरण

अमरावती : परतवाडा येथे जुन्या वादातून एका युवकाची अत्यंत निर्दयतेने हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. लालपूल परिसरात अज्ञात मारेकऱ्यांनी युवकावर तीक्ष्ण शस्त्रांनी अनेक वार केले, त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त  झालेल्या नागरिकांनी बुधवारी परतवाडा येथील बाजारपेठेत दगडफेक आणि लूट सुरू केली, त्यामुळे परतवाडा-अचलपूर शहरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. सल्लू ऊर्फ सय्यद सलमान सय्यद रहमान (२७, रा. आझाद नगर, परतवाडा) असे मृताचे नाव आहे.

आझाद नगराजवळील लाल पुलावरून सल्लू ऊर्फ सलमान हा एकटाच जात असताना आठ ते दहा हल्लेखोरांनी त्याच्यावर वार केले. त्याला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याचा उपचाराआधीच मृत्यू झाला. सल्लूच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी अनेक वार करण्यात आले होते. या घटनेची माहिती परतवाडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, पण तोवर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर एका संशयिताला काल रात्रीच ताब्यात घेतले. इतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

मृत सलमानचे वडील वाहनचालक आहेत. हत्येच्या घटनेनंतर आझाद नगर भागात तणाव निर्माण झाला. लोक मोठय़ा संख्येने रस्त्यावर एकत्र झाले. आरोपींना अटक करावी, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका मृत सलमानच्या कुटुंबीयांनी घेतल्याने तणावात भर पडली. त्यानंतर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढली. दुपारी शवविच्छेदन पार पडले.

दरम्यान, सकाळपासूनच बाजारपेठेत लोक एकत्र आले आणि आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करू लागले. काही लोकांनी दगडफेक आणि लूट सुरू केल्याने भीतीचे वातावरण पसरले. दगडफेकीत आकाश आणि सुधीर श्रीवास्तव हे दोन दुकानदार जखमी झाल्याचे सांगण्यात आले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. सध्या शहरात शांतता आहे.

हल्लेखोर हे सलमानच्या परिचयाचे होते आणि त्यांच्यात मैत्री होती, पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वितुष्ट आले होते. एका युवकावर सलमान याने हल्ला केला होता. त्याबद्दल त्याला शिक्षा देखील सुनावण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी हत्येच्या कारणाचा आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे.