सोमनाथ श्रमसंस्कार छावणीत प्रचंड उकाडय़ातही राज्यातील शेकडो तरुण

उष्णतेने उच्चांक गाठल्यानंतरही आजची तरुण पिढी श्रमसंस्कार छावणीत सहभागी होऊन तलाव खोलीकरणाचे काम करत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. तरुण पिढी हीच देशाचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन डॉ. विकास आमटे यांनी केले. या शिबिरातही राज्यातील ५०० हून अधिक शिबिरार्थी सहभागी झाले असून छावणीचा कालावधी १५ ते २२ मे असा आहे.

सोमनाथ श्रमसंस्कार छावणीत रविवारी पहाटे पाच वाजतापासून शिबिराला सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. या छावणीचे उद्घाटन डॉ. भारती आमटे यांनी ध्वजारोहणाने केले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ. आमटे म्हणाले, आजच्या भरकटलेल्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करून दिशा देण्याची गरज आहे. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन देण्याचे कार्य उत्तमपणे सुरू आहे.

उद्घाटनानंतर त्यांनी सर्व शिबिरार्थीचे स्वागत केले. यावेळी डॉ. भारती आमटे यांनी ‘बाबा आमटे आणि युवकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात पडझरी गावात शिबिरार्थीनी स्वच्छता मोहीम राबविली. सोबतच प्रकल्प परिसरातील तलावांचे खोलीकरण करून जलसंधारणाच्या कामातही हातभार लावला. दुपारच्या सत्रात सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. रोडे यांनी ‘बाबा आमटे यांच्या स्वप्नातील युवक आणि श्रमसंस्कार शिबिरात युवकांचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. विकास आमटे यांनी आनंदवन आणि आनंदवन निर्मितीच्या प्रवासाची माहिती दिली. रात्रीच्या सत्रात भारत जोडो अभियानातील स्वयंसेवकांनी अनुभवकथन केले. विशेष म्हणजे, सोमनाथ येथे आतापर्यंत ४८ शिबिरांमधून हजारो युवक आनंदवन, सोमनाथ, लोकबिरादरी प्रकल्पाशी जोडले गेले व येथून कामाची प्रेरणा घेऊन इतरत्र कार्यरत आहेत. या शिबिरातही राज्यातील ५०० हून अधिक शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.  दररोज पहाटे चार वाजता छावणीचा दिनक्रम सुरू होतो. बहुभाषिक प्रेरणागीत गायन, श्रमप्रतिष्ठेचे नारे देत तरुणाई साडेपाच वाजता श्रमदानासाठी सज्ज होते.

अनिकेत आमटे यांना बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार

गांधीविचार कार्यासाठी बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार-२०१६ यंदा सामाजिक कार्यकर्ते व लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे व्यवस्थापक अनिकेत आमटे यांना जाहीर झाला आहे. त्यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांना अनुक्रमे मूलभूत सामाजिक कार्य व समाजप्रबोधन कार्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. २९ मे रोजी कोथरूड, पुणे येथे गांधी भवन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.