प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरुन मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाची धिंड काढल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात ६० ते ६२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूरजवळील आर्वी गावात राहणाऱ्या तरुणाचे त्याच्या गावात राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील आहेत. २५ एप्रिलला पीडित तरुणाने त्या मुलीला पळवून औरंगाबादला नेले. पुणे, कोल्हापूर या शहरात फिरुन दोघे पुन्हा औरंगाबादमध्ये आले. २९ एप्रिलला दोघेही औरंगाबादमधील एका मित्राच्या घरी असल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यांनी दोघांना पुन्हा गावात आणले.
मुलीला पळवून नेल्याचा राग नातेवाईकांच्या मनात होता. त्या तरुणाला गावातील एका शेतात झाडाला बांधून ठेवण्यात आले. झाडाला बांधून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिलला त्या तरुणाला विवस्त्र करुन त्याची गावात धिंड काढण्यात आली. तरुणाच्या चेहऱ्यावर शेंदूर फासून आणि हलगी वाजवून त्याची गावात धिंड काढण्यात आली. यात सामील झालेल्या काही लोकांच्या हातात तलवारी देखील होत्या.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पीडित तरुणाची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी ६० ते ६२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 10:33 am