करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रभागात रस्ते व गटारींवर सॅनिटायझेन केल्याची माहिती देणारी पोस्ट भाजपाच्या स्थानिक नगरसेविकेने फेसबूकवर टाकली. त्यावर ‘फेकूताई’ अशी प्रतिक्रिया दिल्याने संतापलेल्या नगरसेविकेने संबंधित तरूणाचे घर गाठत त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. आज दुपारी सोलापुरात विजापूर रस्त्यावरील माशाळ वस्तीत हा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित नगरसेविकेसह सहाजणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विजापूर रस्त्यावरील नेहरू नगर परिसरातील भाजपाच्या नगरसेविका अश्विनी चव्हाण यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर नेहरूनगरासह माशाळ वस्ती, भिमाई नगर, कमला नगर आदी भागात रस्त्यांवर व गटारींवर निर्जंतुकीकरण केल्याची माहिती देणारी पोस्ट फेसबूकवर टाकली होती. त्यावर स्वतःचे छायाचित्रही टाकले होते.

आणखी वाचा- साताऱ्यात सशस्त्र टोळक्याचा भररस्त्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न

या पोस्टवर माशाळ वस्ती-भिमाईनगर भागात राहणाऱ्या राहुल चंद्रकांत कदम या तरूणाने ‘फेकूताई’ अशी प्रतिक्रिया दिली. तेव्हा नगरसेविका अश्विनी चव्हाण यांनी राहुल कदम यांचा शोध घेतला आणि त्याचे घर गाठले. राहुल व त्याची पत्नी या दोघांना नगरसेविका चव्हाण यांच्यासह त्यांचे साथीदार चेतन चव्हाण, विवेक गमरे, संकल्प चव्हाण, विक्रम राठोड आदी सहाजणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
राहुल कदम याच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आल्याचे त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.