आकर्षक वेतनामुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि ‘कॉर्पोरेट सेक्टर’ची भुरळ तशी बहुतेकांनाच. भारतीय लष्करी सेवेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त राहण्यामागे जी काही वेगवेगळी कारणे सांगितली जातात, त्यात ही भुरळही एक कारण असल्याचे खुद्द संरक्षणमंत्र्यांनी अलीकडेच नमूद केले आहे. तथापि, राष्ट्रप्रेमाची ऊर्मी असेल तर या मोहमयी दुनियेतूनही बाहेर पडता येते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात स्थिरावलेल्या तीन संगणकतज्ज्ञांनी हेच दाखवून दिले आहे. पुण्यातील बडय़ा सॉफ्टवेअर कंपन्यांमधील उच्च पदावरील नोकरी धुडकावत हे तिघे भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल होत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे फेब्रुवारी २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या हवाई दल सामाईक प्रवेश परीक्षा आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांची ‘एएसएसबी’ मुलाखत प्रक्रिया, हे दोन टप्पे पार पडल्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर झाली. त्यात, देशातील वेगवेगळ्या प्रांतांतील परंतु, आयटी क्षेत्रातील नोकरीनिमित्त पुण्यात स्थिरावलेली उत्तराखंडची रुबी चौधरी, छत्तीसगढमधील पूजा आणि राजकुमार यांचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) अभ्यासक्रमात त्यांनी बी.टेक् . केले आहे. त्यातील एका युवतीचा अपवाद वगळता उर्वरित दोघांना लष्करी सेवेची कोणतीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नाही, हे विशेष. रुबी ही पुण्यातील टेक्  महिंद्रा कंपनीत ‘टेक्निकल असोसिएट्स’ म्हणून तर, पूजा अ‍ॅमडॉक्समध्ये ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ व राजकुमार हा थ्रीडीपीएलएम सॉफ्टवेअर्स सोल्यूशन्समध्ये ‘सॉफ्टवेअर इंजिनीअर’ म्हणून कार्यरत होते. कंपनी रुबी हिला ब्रिटनला पाठविणार होती. परंतु, ती संधी नाकारून हवाई दल निवड प्रक्रियेचा निकाल समजल्यानंतर लगेचच आपण पदाचा राजीनामा दिल्याचे तिने ‘लोकसत्ता’ला सांगितले. तिचे वडील मालमत्ता सल्लागार तर आई गृहिणी. टीव्हीवरील ‘उडाण’ व ‘सी हॉक’ या मालिकांनी संरक्षण दलात जाण्याची प्रेरणा मिळाली. कुटुंबीयांनी आपल्या निर्णयास पाठिंबा दिला आणि लहानपणापासून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याचे तिने सांगितले.
या प्रक्रियेत निवडल्या गेलेल्या पूजाची पाश्र्वभूमी लष्करी सेवेची आहे. तिचे वडील भारतीय हवाई दलात पुणे येथे ९ बीआरडीमध्ये ज्युनिअर वॉरंट ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. हवाई दलातील जीवन आपणास नवीन नाही. उलट आयटी क्षेत्र नवीन अन् वेगळे भासायचे. हवाई दलात निवड झाल्यामुळे आपण आपल्या मूळ जीवनात परतत असल्याचा आनंद आहे, अशी भावना तिने व्यक्त केली. लष्करी जीवन जवळून अनुभवल्यानंतर आपण या सेवेकडे आकर्षित झाल्याची राजकुमारची प्रतिक्रिया आहे. गेल्या वेळी त्याने संरक्षण दलातील सेवेसाठी परीक्षा दिली होती. तेव्हा पाच दिवसांच्या ‘एसएसबी’ मुलाखतीदरम्यान म्हैसूर येथे लष्करी जीवन अगदी जवळून पाहायला मिळाले. तेव्हा निवड झाली नसली तरी दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळाले, असे त्याने सांगितले.     

संरक्षण दलाकडे ‘फ्लाईंग’ झेप
रुबी चौधरी व पूजाची शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशनसाठी (एसएससी) तर राजकुमारची परमनंट सव्‍‌र्हिस कमिशनमध्ये (पीसी) निवड झाली आहे. सिकंदराबाद येथील भारतीय हवाई दलाची प्रबोधिनी आणि नंतर बंगळूरूस्थित हवाई दलाचे अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी प्रत्येकी सहा महिने या प्रमाणे एकूण एक वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते ‘फ्लाईंग ऑफीसर’ अर्थात हवाई अधिकारी म्हणून कार्यरत होतील. या दलातील तांत्रिक विभागात ते काम करतील. या पदावरील अधिकाऱ्यांना किमान ६५ हजार रूपये वेतन मिळते. आयटी क्षेत्राच्या तुलनेत हे अगदीच कमी. परंतु, संबंधितांनी आपण वेतन पाहून नव्हे तर, केवळ आवड लक्षात घेऊन संरक्षण दलात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.