09 March 2021

News Flash

तरुणांनी स्पर्धा परीक्षांचे तंत्र आत्मसात करावे

राष्ट्रीयीकृत बँकांसह विविध शासकीय आस्थापनांमधून ४ लाख ६८ हजार कर्मचारी, अधिकारी २०१९ पर्यंत सेवानिवृत्त होत आहेत.

राष्ट्रीयीकृत बँकांसह विविध शासकीय आस्थापनांमधून ४ लाख ६८ हजार कर्मचारी, अधिकारी २०१९ पर्यंत सेवानिवृत्त होत आहेत. भारतीय टपाल विभागाची बँकिंग सेवा वृद्धिंगत होत आहे. तरुणांना नोकरीच्या प्रचंड संधी खुल्या होत आहेत, त्यासाठी मराठी तरुणांनी स्पर्धा परीक्षांचे तंत्र आत्मसात करावे, असे आवाहन ग्रामीण बँक अधिकारी संघटनेचे महासचिव कृष्णाजी कोठावळे यांनी केले. अभिनव फाऊंडेशन, सिंधुदुर्ग व अभिनव ग्रंथालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेट बँक परीक्षेसंदर्भात आयोजित मार्गदर्शन वर्गात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी दिनेश पांगम, प्रा. गिरीधर परांजपे, देना बँकेच्या सौ. मुग्धा म्हसकर, अभिनव फाऊंडेशनचे अध्यक्ष ओंकार तुळसुलकर उपस्थित होते. कोठावळे म्हणाले, बँक, पोस्ट यांसारख्या शासकीय नोकरभरतीच्या एवढय़ा संधी गेल्या वीस वर्षांत नव्हत्या, त्यामुळे आताच्या विद्यार्थ्यांना ही संधी आहे. त्यांनी कॉलेज जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. नुकत्याच झालेल्या बँक भरतीमध्ये स्थानिक तरुण-तरुणी अगदी कमी आहेत. उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यांचे त्या दृष्टीने प्रशिक्षण झालेले असते. अभ्यास आणि सातत्य असते. ते म्हणाले स्थानिक तरुणांना या प्रक्रियेची पुरेशी माहितीच नसते. कोकणात याबाबत जनजागृती कमी आहे. पदवीधर तरुण कुठेच संधी मिळत नाही तर मुंबई गाठतो. पण तो स्पर्धा परीक्षांकडे फारसा वळत नाही. त्याकरिता अभिनव फाऊंडेशन व अभिनव ग्रंथालयामार्फत केली जाणारी जनजागृती महत्त्वाची आहे. कोठावळे म्हणाले, कोणताही मोठा खर्च न करता परिश्रम, सातत्य ठेवल्यास विद्यार्थ्यांस शाश्वत नोकरी मिळू शकते. बँकेमध्ये पदोन्नतीच्याही संधी चांगल्या आहेत. मुलाखत पद्धत रद्द झाल्याचा फटका मराठी तरुणांना बसत आहे. हे वास्तव आहे. पण प्रश्नपत्रिकांचा सातत्याने सराव ठेवल्यास यश दूर नाही. परांजपे म्हणाले, अभिनव फाऊंडेशनमार्फत अभ्यासिका, पुस्तके, ग्रंथालय या संधी उपलब्ध आहेत. अभ्यासाचे सोपे तंत्र आहे. विद्यार्थ्यांनी ध्यास घेऊन सतत प्रयत्न केल्यास या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले आयुष्य घडवता येईल. पांगम म्हणाले, विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान हवे. वाचन हवे तरच परिस्थितीचे भान येईल. अभिनव ग्रंथालय नेमके हेच काम करीत आहे. प्रतिकूल परिस्थितीतूनच यश मिळते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे कोणत्याही अडीअडचणींचा बाऊ करू नये. यश तुमचेच आहे. बँकिंग मार्गदर्शन वर्गाच्या आयोजनाकरिता अभिनवचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, सचिव अण्णा म्हापसेकर, किशोर चिटणीस, राजू केळुसकर, तुषार विचारे, डॉ. प्रसाद नार्वेकर, विनोद वालावलकर, अमित अरवारी, ग्रंथपाल गीतांजली ठाकूर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळसुलकर यांनी केले.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 12:08 am

Web Title: youth should participate in competitive exams
टॅग : Mpsc Exam,Upsc Exam
Next Stories
1 स्वतंत्र राज्य निर्मिती हा घटनात्मक अधिकार
2 मी मंत्री व्हावे, ही तर आंबेडकरी जनतेची इच्छा
3 ‘जलयुक्त लातूर’साठी देशमुख बंधूंचे १ कोटी
Just Now!
X