पुलवामा हल्ल्याच्या रागातून यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कारवाई केली आहे. त्या तिन्ही पदाधिकाऱ्यांची संघटनेतून हकालपट्टी केली आहे. आदित्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्याने हल्ला केला होता. यात ४१ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकार घडत होते. हे लोण यवतमाळमध्ये पोहोचले होते. वाघापूर परिसरातील वैभवनगर येथे बुधवारी रात्री १० ते १५ तरुणांनी काश्मिरी विद्यार्थ्यांवर ‘वंदे मातरम, भारत माता की जय’ हे नारे म्हणण्याची सक्ती केली. ‘काश्मीरला परत जा’ असे बजावत या सर्वांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांची युवासेनेतून हकालपट्टी केली आहे.

उमर नजीर, उमर रशीद, तजीमुल्ला अली, ओवस मुस्ताक, आमीर मुलाद अशी मारहाण झालेल्या काश्मिरी युवकांची नावे होती. याप्रकरणी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी युवासेना पदाधिकारी अजिंक्य मोटके आणि त्याच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. यापैकी तिघांना यवतमाळच्या कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला असून अजिंक्यला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

हे कृत्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना गुरुवारी सायंकाळीच संघटनेतून काढून टाकण्यात आले आहे, असे आदित्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. आपला राग दहशतवादाविरुद्ध व्यक्त व्हायला हवा. निरपराध लोकांवर राग काढणं योग्य नाही, असेही आदित्य यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बजावले आहे.