आदित्य ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून ते मुख्यमंत्री झाले तर आवडेल असं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मनोहर जोशी पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंनी थेट निवडणुकीच्या रिंगणात यावं असं म्हटलं आहे.

मनोहर जोशी यांना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील की नाही यासंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘मी जोशी आहे पण ज्योतिषी नाही. त्यामुळे असं घडेल तसं घडेल असं सांगणं कठीण आहे. आदित्य ठाकरे यांनी अगदी अल्पकाळात राजकीय जीवनात स्थैर्य मिळवलं आहे. त्यांचे हितचिंतक भरपूर आहेत, त्यापैकी मी एक आहे’. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदावर आले तर मला आवडेल असंही सांगितलं.

विधानसभा निवडणूक लढवणार का?, आदित्य ठाकरे म्हणतात…

आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतील अशा घडामोडी सुरु – संजय राऊत

यावेळी आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी का असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘आदित्य ठाकरेंनी थेट निवडणुकीच्या रिंगणात यावं. लोकशाही मानतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा निवडणूक नको असं म्हणू शकत नाही. आपल्या आजोबा, वडिलांप्रमाणे यांच्यासारखं नामवंत व्हावं यासाठी शुभेच्छा’.

दरम्यान आदित्य ठाकरे वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत बोलणे टाळले. मात्र, माझ्या हातून चांगले काम व्हावे, असेच आपण वागत असतो असे ते म्हणाले.