05 March 2021

News Flash

दोन तप सुविधांचा जप

झांझरोळी धरणाच्या क्षेत्रात वास्तव करणाऱ्या अनेक रहिवाशांना बंधाऱ्याच्या उभारणीवेळी म्हणजेच १९९६मध्ये स्थलांतरित करण्यात आले.

|| नीरज राऊत

झांझरोळी लारपाडय़ाचे रहिवासी २४ वर्षे शुद्ध पाणी, विजेपासून वंचित

पालघर : केळवे रोड रेल्वे स्थानकापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या झांझरोळी लारपाडा येथील रहिवाशी गेल्या २४ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. दररोज ऐकू येणारे बिबटय़ा व इतर जंगली प्राण्यांचे आवाज ऐकून येथील रहिवाशांना आपला जीव मुठीत घेऊन रोजी-रोटीसाठी अनेकदा अंधारात आणि एकांतात प्रवास करणे भाग पडत आहे. बंधाऱ्यावर पर्यटनानिमित्त येणाऱ्या पर्यटकांकडून तसेच शासनाकडून बंधाऱ्यापलीकडे राहाणाऱ्या या रहिवाशांच्या यातना दुर्लक्षित राहिल्या आहेत.

झांझरोळी धरणाच्या क्षेत्रात वास्तव करणाऱ्या अनेक रहिवाशांना बंधाऱ्याच्या उभारणीवेळी म्हणजेच १९९६मध्ये स्थलांतरित करण्यात आले. या रहिवाशांनी बंधाऱ्याच्या पूर्वेकडील भागात वास्तव केले. मात्र या रहिवाशांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. धरणाजवळ जरी राहात असले तरी या रहिवाशांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. त्याशिवाय अद्याप महावितरणकडून वीजपुरवठाही करण्यात आलेला नाही.

झांझरोळी येथील बंधाऱ्यावर पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत असतात. मद्यपान करण्यासाठी बंधाऱ्याच्या उत्तरेच्या व दक्षिणेच्या बाजूला अनेकजण बसत असले तरी बंधाऱ्यापलीकडे राहणाऱ्या लोकवस्तीकडे आणि त्यांच्या समस्यांकडे आजवर पर्यटकांचे व प्रशासनाचे लक्ष गेले नाही. जंगलाच्या कुशीमध्ये वसलेल्या या लारपाडा येथील सुमारे ६० ते ८० रहिवाशांना दररोज बिबटय़ाच्या डरकाळ्या व इतर जंगली जनावरांच्या ओरडण्याचे आवाज ऐकू येतात. काळदुर्ग डोंगराच्या पट्टय़ातील जंगली प्राण्यांसाठी झांझरोळी धरणातील पाणी पिण्यासाठी सोयीचे ठरत असल्याने या लारपाडा भागात जंगली जनावरांचा वावर असतो.

या वसाहतींमधील काही मोजकी मंडळी नोकरीनिमित्त बाहेर पडत असली तरी येथील रहिवाशी आपल्या उपजीविकेसाठी दुधी, भोपळा, पालेभाज्या, कोथिंबीर व इतर भाजीपाला लागवड करतात. मात्र त्यांच्या पिकांवर वानर-माकडांचा हल्ला होत असून अशा प्राण्यांपासून लागवड सुरक्षित ठेवण्यासाठी येथील रहिवाशांनी घुंगरू व धातूंपासून वेगवेगळी उपकरणे तयार केली आहेत. त्यामुळे जंगली जनावर आली की विशिष्ट पद्धतीने आवाज करून त्यांना पळवण्याची युक्ती येथील रहिवाशी करत असतात. शेतमालाची घाऊक बाजारपेठ पहाटे भरत असल्याने आपला जीव मुठीत धरून येथील रहिवासी पहाटे दोन वाजता सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या निर्जन जंगलातून प्रवास करतात. तसेच विद्यार्थ्यांनाही या जंगलातून प्रवास करावा लागतो.

पाण्याचे स्रोत या पाडय़ाजवळ असले तरी ते पिण्यास योग्य नसल्याने येथील रहिवाशी गेल्या २४ वर्षांपासून खड्डे करून त्यामध्ये झिरपणाऱ्या पाण्यापासून आपली गुजराण करीत आहेत. त्यामुळे अनेकदा येथील रहिवाशांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असून अनेकांना त्वचारोगांनी ग्रासले आहे. जवळच्या आरोग्य केंद्रातील परिचारिका आठवडा-पंधरा दिवसांनी या भागात पाहणी दौरा करून आजारी व्यक्तीवर औषधोपचार करतात. मात्र गंभीर आजारी तसेच गरोदर मातांना मात्र चादरीचा वापर करून झोळी तयार करूनच जंगलातील दीड ते दोन किलोमीटर अंतर कापावे लागते.

महावितरण कंपनीने या पाडय़ावर वीज पुरवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र वन विभागाची जागा असल्याने व वनविभागाने आक्षेप नोंदवल्याने आजवर या भागात वीज पोहचणे शक्य झाले नाही. सध्या एका संस्थेमार्फत येथे सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र या पाडय़ाच्या बंधाऱ्यापर्यंत येण्याच्या मार्गावर दिवाबत्ती असणे खूप गरजेचे झाले आहे. या लहानशा पाडय़ावरील नागरिकांना ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसल्याने मूलभूत सोयी सुविधांपासून हा भाग वंचित राहिला आहे.

बैलांची प्रशिक्षण केंद्रे

लारपाडा येथे नागरिकांना शेती व बागायती करण्यापलीकडे दुसरा व्यवसाय नसल्याने येथील नागरिक आपल्या मोकळ्या वेळेत मोकाट आणि वयात येणाऱ्या बैलांना बैलगाडीवर जोडण्यापूर्वी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्याचे काम करतात. बैल काढणे, खांडसरी, झोत अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकारांमध्ये वयात येणाऱ्या बैलाच्या मानेवर बैलगाडीच्या वजनाइतके वजन ठेवून राहटाप्रमाणे बैलाला गोल फिरण्यास भाग पाडले जाते. त्या व्यवस्थेची सवय होईपर्यंत त्याला या झोताला जुंपले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:10 am

Web Title: zanzaroli lar pada citizen twenty four year clean water electricity problem akp 94
Next Stories
1 ‘बळीराजा नको करु आत्महत्या’ ही कविता सादर करणाऱ्या मुलाच्या वडिलांचीच आत्महत्या
2 मित्रासोबत मिळून वडिलांचा मुलावर अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
3 ओबीसींच्या जातनिहाय जनणगनेसाठी सर्वपक्षीय नेते घेणार पंतप्रधानांची भेट-अजित पवार
Just Now!
X