रंगबेरंगी साडय़ा, सळसळता उत्साह, तरुणाईचा जोष आणि गीत-संगीताची नृत्याची बहार उडवत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप’ युवा महोत्सवाची सांगता २३ डिसेंबर रोजी पार पडली. या महोत्सवातील बहुतांशी ‘लिंग समभाव’ ही थीम ठेवण्यात आली होती.
मनोरंजनासोबतच जाणीव जागृतीचा उपक्रम या निमित्ताने झाला. झेप महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘लिंग समभाव’ विषयावर काव्याभिवाचन स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये प्रथम क्र. विजय विळूर, द्वितीय विनिता मयेकर व तृतीय श्रेया लिंगायत यांनी पटकावला. झेप
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी ‘मुलगी झाली हो’ या ज्योती म्हापसेकरलिखित पथनाटय़ातचे सादरीकरण करण्यात आले. यानंतर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते महिला विकास कक्षाच्या जेंडर सेन्सिटिव्हीटी विषयावरील प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले.
अखेरच्या दिवशी फनी गेम्स, प्रश्नमंजूषा, वॉक अ‍ॅण्ड टॉक हे कार्यक्रम सादर झाले. बी. एम. एस., एफ. वाय. बी. एस्सी., अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्स यांच्या फुडस्टॉलचे उद्घाटन झाले. अनेक खाद्यपदार्थ्यांनी विद्यार्थीवृंदाचे रसना तृप्त केली. नॉन गॅस कुकिंक स्पर्धा उत्साहात घेण्यात आल्या. यामध्ये पंचरंगी सँडविच बनविणारी रुमिसा बशीर फोंडू प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. द्वितीय क्रमांक सिद्धी प्रसादे, तर तृतीय क्रमांक तन्वी गद्रे हिने पटकाविला. अकाऊन्टिंग व फायनान्स विभागाने सलाड व चाट ही थीम ठेवून पाककला स्पर्धा घेतली. प्रथम क्रमांक सेजल शाह, द्वितीय नीरजा दांडेकर व तृतीय क्रमांक संपदा ठाकूर व श्रद्धा इरमाल यांनी पटकावला.
खातू नाटय़मंदिरमध्ये गीतगायन हा मेगा इव्हेंट सादर झाला. मॅनेजमेंट क्विझ ही स्पर्धा राधाबाई शेटय़े सभागृहात संपन्न झाली. समाजशास्त्र विभागाचा सामाजिक परिसंवाद दुपारी एक वाजता झाला. डान्सिंग मेगा इव्हेटने सर्वात बहार आणली.
आतापर्यंत झालेल्या स्पर्धातून तृतीय वर्ष विज्ञान १६० गुण, तृतीय वर्ष वाणिज्य १०० गुण व द्वितीय वर्ष कला ९६ गुण असे गुणांकन प्राप्त करीत असताना या वर्षीच्या महाराजा करंडकावर कोण विजेतेपदाची मोहोर उमटवितो याची उत्सुकता सर्वानाच लागून राहिली आहे.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समन्वयक डॉ. यास्मिन आवटे, प्रा. उदय बोडस, प्रा. आनंद आंबेकर व इतर प्राध्यापक, तसेच कर्मचारीवर्गाने प्रयत्न केले.