माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केली आहे. तानाजी सावंत यांच्या बंडखोरीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजपाने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. तानाजी सावंत आपल्या सहा सदस्यांसह भाजपाच्या गोटात दाखल झाल्यामुळे भाजपाचे संख्याबळ ३२ झाले आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अस्मिता कांबळे आणि उपाध्यक्षपदासाठी धनंजय सावंत हे भाजपचे उमेदवार आहेत. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना महाआघाडीकडून उपाध्यक्ष पद मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. महाआघाडीतून पुतण्याला उपाध्यक्षपद मिळत नसल्याचे समजताच तानाजी सावंत यांनी भाजपासोबत घरोबा केला आहे.

मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत आधाची नाराज होते. आपल्या पुतण्याला उस्मानाबाद जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष पद महाविकास आघाडीनं नाकारल्यामुळे तानाजी सावंत यांनी बंडखोरी केली. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, तानाजी सावंत यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तानाजी सांवत यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत तानाजी सावंत यांनी आपला पुतण्या धनंजय सावंत यांना महाविकास आघाडीतून उपाध्यक्ष पद मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. मात्र महाआघाडीतून आपल्या पुतण्याला उपाध्यक्षपद देत नसल्यामुळे नाराज तानाजी सावंत भाजपासोबत जाणं पसंत आहे.