निखिल मेस्त्री

पालघर जिल्ह्यतील जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्यसेवेच्या कामाव्यतिरिक्त ऑनलाइन कामाचा ताप वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यतील तालुका आरोग्य अधिकारी ते आशासेविकापर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीत कामांची ऑनलाइन माहिती  भरण्याचा तगादा लावला जात असल्याने त्यांच्या कामाचा ताण वाढला आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत गावपातळीवर आशासेविका, त्यावर गटप्रवर्तक, आरोग्यसेवक,  साहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,  अशी विविध पदे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर कार्यरत आहेत. या सर्वांना विविध आरोग्य कार्यक्रमांतर्गत कामाचा मोठा व्याप आहे. त्यातच या कामाची इत्थंभूत माहिती सुमारे १५ विविध प्रकारच्या ऑनलाइन सॉफ्टवेअरवरमध्ये भरण्याचे अतिरिक्त काम करावे लागत आहे.

प्रत्येक आशासेविकामागे एका गावात सुमारे हजार नागरिक आहेत. या आशासेविकांना गावपातळीवर स्तनदा, गरोदर माता, नवजात बालके, जोखमीच्या माता यांची विविध माहिती  संकलित करावी लागते.  याच बरोबरीने संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग, कुपोषित बालके यांची नोंद तसेच लसीकरण  अशी कामेही त्यांना करावी लागतात. त्यांनी केलेल्या कामांची माहिती आता शासनाच्या सॉफ्टवेअरवर भरून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याबाबतचे प्रशिक्षण दिले नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे सांगितले जात आहे. त्यातच ग्रामीण बहुल भागात इंटरनेट अभाव असल्याने ही माहिती सॉफ्टवेअरवर भरता येत नाही.

आशासेविका बरोबरीने प्राथमिक उपकेंद्र स्तरावर आरोग्यसेवक  यांना माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत असलेली कामे,  प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत  अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच औषध निर्माण अधिकारी यांच्या बाबतीतही हीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यत दिसत आहे.

आरोग्य सेवेशी हे कर्मचारी निगडित असल्याने त्यांना आरोग्यसेवा वगळता ही कामे करावी लागत असल्याने आरोग्यसेवेवर याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  या पार्श्वभूमीवर  कामांची माहिती भरण्यासाठी आरोग्य केंद्रनिहाय संगणक चालकांची नियुक्त करून आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पुढे येत आहे.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन आरोग्यमंत्र्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली जाईल, असे सांगितले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांची ऑनलाइन माहिती भरण्यासंदर्भाची समस्या लक्षात घेता यासाठी संगणक चालकाची मागणी आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवून करण्यात येईल.

– सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पालघर

तळागाळात जाऊन काम करणाऱ्या आरोग्यसेविकाना ऑनलाइन माहिती भरण्याचा तगादा लावला तर कामावर दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. यासाठी पर्यायी कर्मचारी ठेवणे अपेक्षित आहे.

-प्रज्ञा तायडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिचारिका संघटना, पालघर

आरोग्यसेवेचे अद्ययावतीकरण करण्यासाठी प्रणालीवर माहिती भरल्यास ही माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे. कर्मचाऱ्यांना यासाठीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे कामाचे मूल्यमापनही होईल. याचा फायदा आरोग्य विभागाला व त्याशी निगडित यंत्रणांना होणार आहे.

डॉ. साधना तायडे, संचालक, महाराष्ट्र आरोग्यसेवा, मुंबई</p>