हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह््यातील आक्षी येथील शिलालेख हा मराठी भाषेतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. मात्र मराठी भाषेचा हा वारसा सध्या दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. मात्र या आद्य शिलालेखाचा वनवास आता संपण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. शिलालेखाच्या जतन व संवर्धनासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वाराच्या मूर्तीच्या पायथ्याशी मराठीत कोरलेला शिलालेख अस्तित्वात आहे. ज्यावर श्रीचामुंडाराये करवियले गंगाराये सुत्ताले करवियेले अशी अक्षरे कोरली आहेत. हा शिलालेख मराठी भाषेतील सर्वात जुना शिलालेख म्हणून ओळखला जात असे. मात्र रायगड जिल्ह््यातील आक्षी गावात याहूनही जुना मराठीतील एक शिलालेख आढळून आला आहे.  श्रवणबेळगोळ येथील शिलालेखाची निर्मिती इसवि सन १११६-१७ मध्ये करण्यात आली होती. तर अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील शिलालेखाची निर्मिती इसविसन १०१७ अर्थात ९३४ मध्ये करण्यात आली. त्यामुळे आक्षी येथील हा शिलालेख हा प्राचीन भारतातील मराठी भाषेतील ज्ञात असलेला पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र इतिहासाच्या या अमूल्य ठेव्याच्या नशिबी प्रतारणाच आली आहे. आक्षी येथील एका रस्त्याच्या कडेला हा शिलालेख धूळ खात पडून आहे. पुरातत्त्व विभागानेही शिलालेखाच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे ऊन-वारा-पाऊस याचा मारा सहन करत दुर्लक्षित अवस्थेत हा शिलालेख पडून आहे. शिलालेखावरील अक्षरे अस्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सातत्याने या शिलालेखाचे जतन व संवर्धन करा अशी मागणी एतिहासप्रेमी तसेच स्थानिकांकडून केली जात होती.

ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेने या शिलालेखाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेने ३ लाखांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मराठी भाषादिनी शिलालेखाची पाहणी करीत शिलालेखाचे जतन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचा शब्द दिला होता.

याबाबत अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील यांनी सकारात्मक पाऊल उचलत नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात शिलालेखाचे जतन करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे.पुरातत्त्व विभागामार्फत या शिलालेखाचे संवर्धन केले जाणार आहे.

यासाठी जिल्हा परिषदेने पुरातत्त्व विभागाशी संपर्कही साधला आहे. पुरातत्त्व विभागानेही यात सकारात्मक  प्रतिसाद देत लवकरच शिलालेख जतन व संवर्धनाचे काम हाती घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आक्षीच्या आद्य शिलालेखाचा वनवास संपेल अशी अपेक्षा आहे.

आक्षी शिलालेखावरील मजकूर

आक्षी येथे खोदकाम करताना सापडलेल्या या शिलालेखावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या आहेत. या लिपीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. पश्चिाम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराययांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला असून, महालक्ष्मीदेवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शके ९३४ मधील प्रभव संवत्सर अधिक कृष्णपक्षातील शुक्रवारी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख इथे आहे. तसेच शिलालेखाचे विद्रूपीकरण करणाऱ्याला शापही देण्यात आला आहे.

शिलालेखाच्या संवर्धनासाठी जिल्हा परिषदेने तीन लाख रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी अधिक निधी लागला तरी तो उपलब्ध करून देण्याची आमची तयारी आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा झाली आहे. लवकरच शिलालेखाच्या संवर्धनाचे काम सुरू होऊ शकेल.

– डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद