पालघर : ‘नो मास्क, नो एन्ट्री’ या राज्य सरकारच्या धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांना जिल्हा प्रशासनाने २०० रुपयांचा दंड ठोठावला आणि त्यांना नवीन मुखपट्टी परिधान करण्यासाठी दिली.
पालघर जिल्हाधिकारी यांच्या दालनात एका विषयावर मंगळवारी चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. भारती कामडी यांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास दालनात प्रवेश केला. जिल्हाधिकारी यांच्यासमोर त्या आसनस्थ होत असताना त्यांच्याकडे मुखपट्टी नसल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता आपण मुखपट्टी परिधान करायला विसरल्याची त्यांनी प्रांजळपणे कबुली
दिली. राज्य शासनाच्या धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी परिधान न करणे गुन्हा आहे. त्यावर २०० रुपयांची दंडात्मक आकारणी होते. त्यानुसार जिल्हा अध्यक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मुखपट्टी परिधान करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचे अनुकरण जिल्ह्यात इतर ठिकाणी करण्याची अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केली. आगामी काळात निष्काळजी दाखवणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई मोहीम हाती घेण्यात येईल असे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:04 am