ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा गुणवत्ता विकास कार्यक्रम रायगड जिल्ह्य़ात राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना नुकतेच गुणवत्ता पुरस्काराने गौरविण्यात आले.

शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्य़ातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमधून स्वयंमूल्यमापन करून त्याचा अहवाल तालुकास्तरावर संकलित करण्यात आला. तालुकास्तरावरील समितीने शाळांचे मूल्यमापन करून प्रथम तीन क्रमांकाच्या शाळांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे सादर केले. त्यामधून गुणानुक्रमे प्रथम दहा शाळांचे जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीमार्फत करण्यात आले. सदर मूल्यांकनामध्ये शालेय व्यवस्थापन लोकसहभाग, शैक्षणिक संधीची समानता, शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन इ. मुद्दय़ांच्या अनुषंगाने मूल्यमापन करण्यात आले. अंतिम गुणवत्ता तक्त्यानुसार जिल्ह्य़ातील प्रथम तीन शाळांचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. १) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडसुरे, ता. म्हसळा, रुपये-१० हजार, २) रायगड जिल्हा परिषद शाळा, रानवडे, ता. माणगांव, रुपये-७ हजार ५००, ३) रायगड जिल्हा परिषद शाळा, दिवील, ता. पोलादपूर, रुपये ५ हजार यांना धनादेश व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती व समितीचे सदस्य यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा कापडेखुर्द यांना श्रीमती मीनाक्षीताई रणपिसे शिक्षण समिती सदस्य यांच्यामार्फत उत्तेजनार्थ २ हजार ५०० रुपये व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास शिक्षण, क्रीडा व आरोग्य समिती सभापती मनोहर (भाई) पाशिलकर, सर्व शिक्षण समिती सदस्य, शिक्षणाधिकार (प्राथमिक/माध्यमिक), उपशिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग व पुरस्कारप्राप्त शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.