केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने त्रिपुरातील सिपाहीजला वन्यजीव अभयारण्यात बर्फाळ बिबटय़ा (क्लाऊडेड लेपर्ड), छोटय़ा शेपटीचा मकाऊ (पिग टेल्ड मकाऊ), बिटुरोंग आणि चष्मेवाला माकड (स्पेक्टॅकल्ड मंकी) या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मीळ वन्यजीवांच्या प्रजननासाठी परवानगी दिली आहे. देशात वन्यजीवांच्या प्रजननाची परवानगी असलेली अवघी ४२ राष्ट्रीय प्रजनन केंद्रे असून, यात आता सिपाहीजला अभयारण्याचाही समावेश झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात दुर्मीळ वन्यजीवांसाठीच्या प्रजननाचे एकही केंद्र नसल्याने राज्यातील नामशेष होणाऱ्या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धनावर प्रश्नचिन्ह लागले आहे.   
महाराष्ट्रातील माळढोक (ग्रेट इंडियन बस्टार्ड), जंगली म्हैस (वाइल्ड बफेलो), शेकरू (जायंट स्क्विरल), गिधाडे (व्हल्चर) यांचे अस्तित्व धोक्यात आहे, परंतु त्यांचा वंश वाढावा आणि नव्या पिढीलाही त्यांचे दर्शन घडावे ही दूरदृष्टी ठेवून राष्ट्रीय प्रजनन केंद्रासाठी एखादा प्रस्ताव  पाठवावा, असे वनखात्याच्या एकाही बडय़ा अधिकाऱ्याच्या मनात आलेले नाही. हे दुर्मीळ वन्यजीव कायमचे संपतील तेव्हा महाराष्ट्राच्या वनखात्याला जाग येणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वाघ, बिबटय़ा, अस्वल यांना पिंजऱ्यात बंद करून ठेवल्यानंतर त्यांच्या जंगलातील सवयी पूर्णपणे सुटून जातात. त्यांची पिल्ले पिंजऱ्यात वाढल्यास ती हिंस्र प्राण्यांप्रमाणे वाढू शकत नाहीत. त्यांना आयते अन्न खाण्याची सवय लागते. त्यामुळे प्राणिसंग्रहालयांना वन्यजीव प्रजननाची परवानगी दिली जात नाही, परंतु ज्या प्रजातींचा वंश वाढविला जाऊ शकतो, असे पक्षी-प्राणी प्रजनन करण्यास मनाई नाही. यासाठी प्रजनन केंद्रांच्या परवानगीचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून असा पाठपुरावा न झाल्याने महाराष्ट्राला राष्ट्रीय प्रजनन केंद्र अद्यापही मिळालेले नाही. गडचिरोली जंगल परिसरात शेकरूचे मोठय़ा प्रमाणात अस्तित्व असताना पाण्याच्या टंचाईमुळे शेकरूंची पिल्ले मरत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर पाण्याची व्यवस्था करण्यात आली, हे अगदी अलीकडचे ताजे उदाहरण आहे. या शेकरूचा वंश राष्ट्रीय प्रजनन केंद्रात वाढवला जाऊ शकतो, परंतु दूरदृष्टीच्या उपायांचा विचार केला जात नसल्याने त्याचा फटका दुर्मीळ वन्यजीवांच्या अस्तित्वाला बसणार आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रीय प्रजनन केंद्रासाठी परवानगी मिळाल्यास दुर्मीळ होत चाललेल्या वन्यजीव प्रजातींचे संवर्धन शक्य होईल, असे वन्यजीव अभ्यासक कुंदन हाते यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.