जि. प.चे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारती यांच्यात एका प्रस्तावावर सही करण्याच्या कारणावरुन सुरुवातीला शाब्दीक वाद व नंतर थेट शिवीगाळ झाल्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात घडला. भारती यांनी अब्दुल्ला यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अब्दुल्ला यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला. तर अब्दुल्ला यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन कारवाईची मागणी केली.
भारती हे सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होते. दुपारी बाराच्या सुमारास जि. प. अध्यक्ष अब्दुल्ला सहकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. भारती यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवून सही करण्याची मागणी केली. त्यातून दोघांमध्ये सुरू झालेला शाब्दीक वाद शिवीगाळीपर्यंत पोहोचला. परस्परांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्यानंतर भारती यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना कळवून थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली.
दुपारी दोनच्या सुमारास भारती हे पोलीस संरक्षणात जि. प. सभागृहात हजर झाले. अधिकारी व कर्मचाऱ्यांची बठक घेऊन घडलेला प्रकार सांगून ‘लेखणी बंद’चे आवाहन केले, तर अध्यक्षांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांच्या दालनात भारती यांनी आपली कैफियत मांडली. याच वेळी अब्दुल्ला हेही भारती यांच्या विरोधात लेखी तक्रार घेऊन जावळेकर यांच्या दालनात आले. भारती यांनी आपल्याला शिवीगाळ करून अपमान केला. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करा, अन्यथा आपण राजीनामा देऊ,असा इशारा त्यांनी दिला.
काही सदस्यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण आपसांत मिटवण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने प्रकरण सायंकाळपर्यंत मिटवण्यात यश आले नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आगमन पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या जि. प.त उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला सहीसाठी शिवीगाळ करण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वीही जिल्हय़ातील ३ गटविकास अधिकारी राजकीय पुढाऱ्यांच्या धमक्यांमुळे दीर्घ रजेवर गेले आहेत.