जिल्हाधिकारी कागदोपत्री चारा उपलब्ध असल्याचे दाखवत जनावरांच्या छावण्या व चारा डेपो सुरू करण्यास नकार देत आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही, याचेच हे द्योतक आहे. पालकमंत्र्यांनी यासंदर्भात लक्ष घालावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी दिला आहे. या प्रश्नावर आपण शिंदे यांनाही भेटणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी गुंड यांच्या नेतृत्वाखाली जि.प.च्या पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीबद्दल भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी जिल्हय़ात विशेषत: दक्षिण भागात चाराटंचाई जाणवत असल्याने छावण्या व चारा डेपो सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. या पाश्र्वभूमीवर आज, शनिवारी पत्रकारांशी बोलताना गुंड यांनी हा इशारा दिला.
गुंड म्हणाल्या, जिल्हय़ातील टंचाईची वस्तुस्थिती पालकमंत्र्यांनाही माहिती आहे, परंतु जिल्हा प्रशासन सरकारला चुकीची माहिती देत आहे. पुरेसा पाऊस नसल्याने खरीप हंगाम पूर्णत: गेला आहे. शेतकऱ्यांकडे साठवलेला चाराही संपला आहे. चारा म्हणून शेतकऱ्यांनी उसाचा वापर सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेला दूध धंदाही मोडकळीस आला आहे. तरीही प्रशासन छावण्या व चारा डेपो सुरू करण्यास नकार देत आहे. त्यामुळे यासंदर्भात पालकमंत्र्यांनीच आता पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी चारा उपलब्ध असल्याची आकडेवारी देत आहेत, ती कागदावरील आहे. प्रत्यक्षात जिल्हय़ाच्या दक्षिण भागात चाराटंचाई आहे. टँकरच्या पाणीपुरवठय़ातही जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा विचार केलेला नाही. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. टँकरच्या खेपाही कमी होत आहेत. कर्जत-जामखेडसह श्रीगोंदे व पारनेरसाठी कुकडीचे आवर्तन सोडण्याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशीही मागणी गुंड यांनी केली.