जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीच्या सभा आज, मंगळवारी चक्क शहरातील एका परमीट रूम व बीअर बार असलेल्या हॉटेलमध्ये झाल्या. या दोन्ही सभांचे अध्यक्षपद, दोन्ही समित्यांचे सभापती तथा जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी भूषवले. विशेष म्हणजे या सभांनंतर शेलार तडक विसापूर धरणातून पाणी सोडण्यासाठीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण आंदोलनात सहभागी झाले.
शिक्षण व आरोग्य समितीच्या सभा चक्क परमीट रूम व बीअर बार असलेल्या एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आल्याने जि.प.च्या वर्तुळात खळबळ उडाली होती. या सभा स्टेशन रस्त्यावरील, अहमदनगर कॉलेजलगत नव्यानेच उभारण्यात आलेल्या ‘हॉटेल राजश्री परमीट रूम व बीअर बार’मध्ये झाल्या. दुपारी १२ वाजता आरोग्य समिती व १ वाजता शिक्षण समितीची सभा झाली. विशेष म्हणजे या सभांना जिल्हय़ातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.
शिक्षण समितीचे सचिव प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक कडुस आहेत तर आरोग्य समितीचे सचिव जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. पु. ना. गांडाळ आहेत. सभेनंतर शिक्षणाधिकारी कडुस यांनी हॉटेलमध्येच तालुका अधिकाऱ्यांकडून आढावाही घेतला. सभेचा अजेंडा सचिवच काढतात. या विषयपत्रिकेवर सभेचे ठिकाण म्हणून जि.प. उपाध्यक्षांचे दालन असेच नमूद करण्यात आले होते.
जि.प.च्या कोणत्याही विषय समितीची मासिक सभा मुख्यालयाबाहेर आयोजित करायची असल्यास त्यासाठी जि.प. अध्यक्षांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. मात्र अशी परवानगी मागणारा अर्जच अध्यक्षांना सादर करण्यात आलेला नव्हता. अशी पूर्वपरवानगी घेऊन यापूर्वी जिल्हय़ात विविध ठिकाणी यापूर्वी विषय समित्यांच्या सभा झालेल्याही आहेत, मात्र परमीट रूम व बीअर बारमध्ये झालेली ही सभा पहिलीच ठरावी.
विधानपरिषदेची तयारी?
शिक्षण समितीच्या एका सदस्याशी हॉटेलमध्येच संपर्क साधला असता त्यांच्या पतीने त्याने या जेवणावळी सुरू होण्यास कारण आहे, ‘त्यांना’ विधानपरिषदेचे वेध लागले आहेत, अशी मार्मिक टिप्पणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हय़ातील विधानपरिषदेच्या जागेसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे.