वेळोवेळी आदेश देऊनही कामात टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण विभागातील १४ कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली. मितभाषी ओळख असणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या या कारवाईची जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा होती.
नांदेड जि.प.चा शिक्षण विभाग गरप्रकार, अनागोंदीसाठी प्रसिद्ध आहे. राजकीय वरदहस्त असेलेले अनेक कर्मचारी शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून ठाण मांडून असले, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. कसेही वागलो, तरी आपले कोणीच काही करणार नाही, अशी भावना त्यांच्यात बळावली आहे. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. एखाद्या प्रकरणाचा निपटारा करण्यास कर्मचारी संबंधितांना अनेकदा हेलपाटे मारावयास लावतात. कोणतेही काम वेळेवर होत नाही, असा एकूण अनुभव आहे.
स्वतजवळील संचिकांचा तत्काळ निपटारा करा, शिक्षकांची कामे त्वरेने मार्गी लावा, असे निर्देश शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी यांनी दिले होते. शिवाय स्वतच्या कामाचा आठवडी गोषवारा व संचिका संकलन नोंदवही अद्ययावत ठेवा, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. परंतु निर्ढावलेल्या काही कर्मचाऱ्यांनी याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले. वारंवार सांगूनही काही कर्मचाऱ्यांच्या वर्तनात बदल होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी यांनी १४ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
वरिष्ठ लिपिक सिद्धार्थ हत्तीअंबीरे, एस. व्ही. पाईकराव, पी. एस.चोखाळेकर, जी. जी. मादसवार, व्ही. बी. रेणगुंठवार, पी. व्ही. टरके, के. एम. कांबळे, ए. बी. शिरसेटवार, डी. एस. महािलगे, वाय. यू. वाकळे, बी. डी. सुरकुटवार, एस. जी. वाघमारे, सी. एम. भट व एम. एम. बसवंते या १४ कर्मचाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली. दोन दिवसांत खुलासा करा, अन्यथा सक्त कारवाईचा इशारा त्यांना दिला आहे.
काहींना अभय!
शिक्षणाधिकाऱ्यांनी १४ जणांना नोटीस बजावली असली, तरी शिक्षण विभागातील बहुतांश कर्मचारी कामचुकारपणा करतात, हे सर्वश्रुत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना त्वरेने काम करण्याबाबत ताकीद दिली होती. पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी १४ जणांना नोटीस बजावताना काही कर्मचाऱ्यांना मात्र ‘अभय’ दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती. संस्थाचालक असलेल्या व शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला या कारवाईतून वगळले, या बद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.