ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त, तेथे त्या पक्षाचा अध्यक्ष!
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आघाडी करून सत्तास्थापनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यात सोमवारी सकाळी तासभर चर्चा झाली. जेथे ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त तेथे त्या पक्षाचा अध्यक्ष हे सूत्र पवार-चव्हाण यांच्यातील चच्रेनंतर नक्की झाले. या माहितीला स्वत: चव्हाण यांनी नंतर दुजोरा दिला. ही चर्चा अत्यंत सकारात्मकपणे झाल्याचे खासदार चव्हाण यांनी नंतर ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पवार वेगवेगळय़ा कार्यक्रमांच्या निमित्ताने रविवारी दिवसभर नांदेडमध्ये होते. या दरम्यान भाजपच्या काही नेत्यांसह शिवसेनेच्या दोन स्थानिक आमदारांनी खासदार पवारांची भेट घेऊन, नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसऐवजी आमच्यासोबत आघाडी करा, पदांची वाटणीही तुम्हीच ठरवा, अशी गळ घातली. पवारांनी त्यांचे म्हणणे फक्त ऐकून घेतले.
खासदार पवार सोमवारी सकाळी येथून पुण्याकडे रवाना झाले. तत्पूर्वी खासदार चव्हाण यांनी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह त्यांची भेट घेऊन केवळ नांदेडच नव्हे, तर अन्य ज्या जि.प.मध्ये संख्याबळ जुळते तेथे आघाडी करण्याबाबत चर्चा केली. या चच्रेनंतर उभय पक्ष मार्चच्या पहिल्या आठवडय़ात जिल्हा परिषदांतील संख्याबळाच्या जिल्हानिहाय आढावा घेऊन आघाडीचे सूत्र निश्चित करणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसंबंधी अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे. अन्य जिल्’ाांमध्ये भाजपसोबत युती करणार नाही, असे त्यांनी मुंबई मनपाच्या प्रचारादरम्यान जाहीर केले होते. त्यांची ती भूमिका अद्याप कायम असताना नांदेड जिल्’ाात पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी परस्पर भाजप नेत्यांसोबत बठका घेणे सुरू केल्याचे उघड झाले आणि या दोन्ही पक्षांच्या स्थानिक मंडळींनी थेट पवारांकडेच तीन पक्षांच्या युतीचा प्रस्ताव दिल्याने शिवसेनेच्या वरच्या आणि खालच्या धोरणांतील भिन्नता पुढे आली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नांदेडमधील या प्रकारावर कोणतेही भाष्य केले नाही. मुंबई मनपाच्या सत्तास्थापनेत काँग्रेस पक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. त्यावर वेगवेगळय़ा प्रकारची वक्तव्ये समोर आली आहेत. पण खासदार अशोक चव्हाण यांनी येथे स्पष्ट केले, की मुंबई मनपात पक्षाने काय करायचे, याचा निर्णय प्रदेश किंवा मुंबई काँग्रेसच्या पातळीवर नव्हे, तर अ. भा. काँग्रेस कार्यकारिणीत होईल. शिवसेना नेतृत्वाकडून तुमच्याकडे काही प्रस्ताव आला आहे काय, या प्रश्नावर कोणताही प्रस्ताव नाही; चर्चादेखील नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
भाजपजिल्हाध्यक्षही भेटीला
दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची रविवारी दुपारनंतर स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यांनीही पवारांकडे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा प्रस्ताव ठेवला. या युतीमध्ये पदांची वाटणी तुम्हीच करा, असेही रातोळीकर यांनी पवारांना सांगितले.
या वेळी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कमलकिशोर कदम उपस्थित होते. स्वत: कदम यांनी भाजप-शिवसेनेऐवजी काँग्रेससोबत आघाडी करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2017 2:07 am