शिवसेनेला सर्वाधिक १८ जागा राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी; १४ जागांवर विजयी भाजप, बहुजन विकास आघाडीची घसरण

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांकरिता झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी सत्ताधारी भाजपचा धुव्वा झाला आहे. गेल्या निवडणुकीत २१ जागा मिळवणाऱ्या भाजपला १४ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेने सर्वाधिक १८ जागा मिळवल्या, तर २०१५च्या निवडणुकीत केवळ चार जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत १४ जागांवर यश प्राप्त केले. त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकरिता व विषय समित्यांसाठी नव्याने युती-आघाडी होण्याची गरज भासणार आहे.

जिल्हा परिषदेकरिता ७ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत सहा लाख ६७ हजार २६६ मतदारांनी (६४.५० टक्के) आपला हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजणी तालुकानिहाय केंद्रांवर बुधवारी सकाळी १० वाजता सुरू झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. या प्रसंगी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

या निवडणुकीत शिवसेनेने १८ जागांवर विजय संपादन केला असून राष्ट्रवादी काँग्रेसने १४ जागांवर मुसंडी मारली आहे. भाजपची ताकद असलेल्या विक्रमगड, तलासरी, डहाणू व वाडा या ठिकाणी अवस्था बिकट झाली असून भाजपची सदस्यांची संख्या २१ वरून १२वर आली आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष पाच तर काँग्रेस एक यांनी आपले पूर्वी इतके संख्याबळ राखले असून बहुजन विकास आघाडीची सदस्य संख्या १० वरून चारवर आली आहे. या निवडणुकीत तीन अपक्षांनी विजय संपादन केला असून या प्रत्येकी एक अपक्षाला आपण पुरस्कृत केल्याचा दावा अनुक्रमे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बहुजन विकास आघाडीने केला आहे.

शिवसेनेने पालघर तालुका या त्यांच्या बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व राखून १७ पैकी दहा जागांवर विजय संपादन केला. या तालुक्यात भाजप व बहुजन विकास आघाडीला प्रत्येकी तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय संपादन करता आला. डहाणू तालुक्यातील १३ जागांपैकी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी चार जागांवर विजय संपादन केला. शिवसेनेने तीन काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी एक जागेवर विजय संपादन केला. वाडा तालुक्यातील सहा जागांपैकी जिजाऊ  संस्थेच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर विजय संपादन केला तर शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

वाडय़ात भाजपाला भोपळाही फोडता आला नाही. विक्रमगड तालुक्यातील पाच जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन तर शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एका जागेवर विजय झाले. तलासरी तालुक्यातील पाच जागांपैकी कम्युनिस्ट पक्षाने चार जागांवर विजय संपादन केला तर भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले.

जव्हार तालुक्यातील चार जागांपैकी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाने प्रत्येकी एक जागेवर विजय संपादन केला तर मोखाडामधील तीन जागांपैकी भाजपकडे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक जागा गेल्याचे दिसून आले आहे. वसई तालुक्यातील चार जागांपैकी बहुजन विकास आघाडी, भाजपा, शिवसेना व अपक्ष यांनी प्रत्येकी एक जागा वाटून घेतली असल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले आहे.

गतवेळच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले तसेच सदस्य राहिलेल्या भावना विचारे, भारती कांबडी, गुलाब राऊत, प्रकाश निकम व काशिनाथ चौधरी या सहा सदस्यांनी पुन्हा निवडणूक जिंकण्याची किमया साध्य केली. या निवडणुकीत शिवसेनेने जिल्हा परिषदेमध्ये आपले पूर्वीचे संख्याबळ वाढवले तर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी भरारी घेतल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकीत भाजप तसेच बहुजन विकास आघाडीचे ताकद कमी झाल्याचे दिसून आले आहे.

गटनिहाय विजयी उमेदवार

शिवसेना (१८)- गंजाड, धाकटी डहाणू, वणई (डहाणू), तलवाडा (विक्रमगड), कासारवाडी (जव्हार), मोज, कुडूस (वाडा), तारापूर, दांडी, पास्थळ, सरावली, बऱ्हाणपूर, सावरे-ऐंबूर, सातपाटी, माहीम, केळवा, एडवण, भाताणे.

राष्ट्रवादी काँग्रेस (१४)- मोडगाव, सायवन, एसरविरा, कासा (डहाणू), उटावली, दादडे, कुझ्रे(विक्रमगड) कौलाळे (जव्हार), आसे (मोखाडा) गारगाव, मांडा, पालसई, अबिटघर (वाडा), खैरापाडा (पालघर)

भाजपा (१२)- सूत्रकार (तलासरी) बोर्डी जामशेत, कैनाड, सरावली (डहाणू), न्याहाळे ब्रु. (जव्हार), वोशेरा, खोडाळा (मोखाडा), बोईसर, बोईसर (वंजारपाडा), नंडोरे-देवखोप (पालघर), अर्नाळा (वसई)

कम्युनिस्ट पक्ष (५)- उपलाट, डोंगारी, उधवा, झाई (तलासरी) वावर (जव्हार)

बविआ (४)- शिगाव-खुताड, मनोर, सफाळे

(पालघर) कळंब (वसई)

काँग्रेस (१)- चिंचणी (डहाणू)

अपक्ष (३)- धामणगाव (डहाणू), चंद्रपाडा (वसई), आलोंडा (विक्रमगड)