राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. या काळात काही ठिकाणी मतदानाला गालबोट लावणाऱ्या घटनांचीही नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील भानखेडा येथील मतदान केंद्रावरही असाच प्रकार घडला. मतदान अधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना मुख्याध्यापक चंद्रप्रकाश तानबाजी तडस हे मद्यधुंद अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तडस यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

भानखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील मतदान केंद्रावर चंद्रप्रकाश तानबाजी तडस यांची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर चंद्रप्रकाश तडस हे मद्यपान करून केंद्रावर वावरत होते. याकाळात त्यांनी महिलांशी असभ्य वर्तन केले. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांशीही वाद घालत शिवीगाळ केली. त्यामुळे प्रशासनाला ऐनवेळी दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागली. तडस यांच्या गैरवर्तनाची दखल घेत आष्टीचे नायब तहसिलदार अमोल कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

आणखी वाचा- …म्हणून ‘या’ मतदारसंघात केवळ एकाच मतदाराने केलं मतदान !

दरम्यान, या घटनेची वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेतली. निवडणुकीसारख्या अतिसंवेदनशील कामाच्या वेळी बेजबाबदारपणे दारू पिऊन निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. हे वर्तन गंभीर असल्याचे सांगत तडस यांना निलंबित केले आहे.