रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. हुकूमचंद पाटोळे यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य आणि शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्यासह दोन जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोग्य सेवकाच्या बदली प्रकरणात सहकार्य न केल्याने डॉ. पाटोळे यांना सातत्याने शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला जात होता. अमोल खैरनार नामक आरोग्य सेवकाच्या बदलीमध्ये अंशत: बदल करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्याकडून आपल्यावर प्रचंड दबाव आणला होता.
 मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हुकूमचंद पाटोळे यांनी त्याच्या बदलीत अंशत: बदल करण्यास नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या आस्वाद पाटील यांनी ३० मार्च रोजी झिराड येथील जाहीर कार्यक्रमात आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याच दिवशी संध्याकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पाटोळे यांना पुन्हा एकदा शिवीगाळ करण्यात आली होती. यापूर्वी या प्रकरणात पोलिसांकडे दोन तक्रारी नोंदविल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन पाटोळे यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले होते.
पोलीस संरक्षणात डॉ. पाटोळे शुक्रवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास दैनंदिन कामकाजाकरिता जिल्हा परिषदेतील आपल्या कार्यालयात जात होते. या वेळी त्यांचे पोलिस संरक्षक पोलीस नाईक वाघाटे हेही त्यांच्यासोबतच होते. या वेळी सुरेश ऊर्फ बलमा पाटील याने डॉ. पाटोळे यांना गाठून ‘आठ दिवस प्रोटेक्शनमध्ये फिरशील, नवव्या दिवशी तुझा कोथळा बाहेर काढू’ अशी धमकी दिली. पोलीस नाईक वाघाटे याने बलमाला हटकले. तेव्हा तो ‘अशा पिस्तूल भरपूर पाहिल्यात’ असे बोलून निघून गेला. त्यामुळे वाघाटे यांच्या मदतीने डॉ. पाटोळे आपल्या कार्यालयात निघून गेले.
कामकाज आटोपून डॉ. पाटोळे आपल्या कार्यालयातून बाहेर आले असता पुन्हा सुरेश ऊर्फ बलमा तेथे आला आणि त्याने डॉ. पाटोळे यांची कॉलर पकडत पुन्हा मारण्याची धमकी दिली. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे यांनी तातडीने अलिबाग पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील यांचा हात असल्याचे पाटोळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीनंतर अ‍ॅड. आस्वाद पाटीलसह बलमा याच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, हल्ला करणे याप्रकरणी भादंवि कलम ३५२, ३५३, ३३२, १८६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
आस्वाद पाटील हे माजी आमदार मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव असून विद्यमान आमदार पंडित पाटील आणि आमदार जयंत पाटील यांचे पुतणे आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांचे पती आहेत.  
याबाबत आस्वाद पाटील यांच्याशी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता डा्रॅ. पाटोळे यांच्याविरुद्ध आपणही गुन्हा दाखल करत असल्याचे त्यांनी सांगितले.