जिल्हा परिषदेच्या अधिका-यासाठी आणलेली नवी कोरी वाहने लगेचच पदाधिका-यानी बळकावत आपल्या दिमतीला घेतली आहेत. महिन्यापूर्वीच पदाधिका-यानी सूत्रे हाती घेतली. त्यानंतर काही दिवसांतच अधिका-यासाठी नव्या गाडय़ा आल्या. मागील पदाधिका-यानी वापरलेली वाहने नव्यांना लगेच नकोशी झाली आणि ही वाहने आपल्याला मिळावीत यासाठी पदाधिका-यानी आघाडी उघडली. या मोहिमेपुढे अखेर अधिका-याना माघार घ्यावी लागली.
जिल्हा परिषदेच्या ताफ्यात चांगली कार आली, की ती लगेच आपल्याला मिळावी, यासाठी पदाधिका-याचे नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. ही चढाओढ नेहमीच जि.प.च्या अंतर्गत वर्तुळात रंगत आणत असते. नव्या पदाधिका-यानीही आपण या चुरशीत मागे नाहीत, हे दाखवून दिले आहे. सहा-सात महिन्यांपूर्वीच तत्कालीन जि.प. अध्यक्ष व समाजकल्याण सभापती यांच्यामध्ये नवीन कार उपलब्ध होण्यासाठी कुरघोडय़ा झाल्या होत्या. माजी बांधकाम सभापती कैलास वाकचौरे यांनी नवी गाडी मिळेपर्यंत तब्बल दीड वर्षे स्वत:चीच गाडी वापरणे पसंत केले होते.
जि.प.ने गेल्या आठवडय़ात तब्बल ३० लाख रुपये खर्च करून ५ ओटीएस-टोयाटो या गाडय़ा घेतल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत व प्रशासन, दोन अर्थ विभागासाठी तर एक महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीसाठी ही वाहने खरेदी करण्यात आली होती. महिला व बालकल्याण सभापतींना त्यांचे वाहन मिळाले, मात्र त्यातील इतर चार वाहने लगेच उपाध्यक्षांसहित इतर चौघा सभापतींनी ताब्यात घेतली. महिला व बालकल्याणच्या माजी सभापती हर्षदा काकडे यांनी तर आपल्या कालावधीत नवे वाहन उपलब्ध व्हावे यासाठी प्रचंड पाठपुरावा केला होता, परंतु त्यांचा पाठपुरावा नव्या सभापती नंदा वारे यांच्यासाठी फायदेशीर ठरला.
विशेष म्हणजे समाजकल्याण व कृषी-पशुसंवर्धन सभापतींची वाहने तर नवीच होती, ही वाहने खरेदी करून वर्षही पूर्ण झाले नव्हते. परंतु नव्यांना पूर्वीच्या सभापतींची ही वाहने लगेच नकोशी झाली. नवी वाहने वाटप करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिका-याकडे आहे. परंतु मुख्य कार्यकारी अधिकार-यानाही नव्या पदाधिका-याचा हट्ट मान्य करावा लागला. इतर पदाधिका-याना नवी वाहने मिळाल्याने आता अध्यक्षांनाही नव्या वाहनाचे वेध लागल्याचे समजते.